पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज
By Admin | Updated: March 31, 2017 02:01 IST2017-03-31T02:01:28+5:302017-03-31T02:01:28+5:30
निसर्गाची महत्त्वाची देण पाणी असून त्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज आहे. यासाठी गावकऱ्यांनी सामूहिकरित्या श्रमदानातून प्रयत्न करणे गरजेचे आहे,

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज
पोपटराव पवार : पाणी फाऊंडेशनकडून जनजागृतीपर कार्यक्रम
आर्वी : निसर्गाची महत्त्वाची देण पाणी असून त्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज आहे. यासाठी गावकऱ्यांनी सामूहिकरित्या श्रमदानातून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव कार्यक्रमाचे संचालक पोपटराव पवार यांनी येथे व्यक्त केले.
प्रसिद्ध सिनेनट अमीर खान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘सत्यमेव जयते वाटर कप’च्या माध्यमातून पाणी फांउडेशनच्यावतीने गुरूवारी येथील सहकार मंगल कार्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा तर अतिथी म्हणून तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी सरिता पवार आदी उपस्थित होते.
पवार पूढे म्हणाले की, पाणी हे जीवन आहे. मानवालाच नव्हे तर प्राण्यांनाही दिलेली ही अमूल्य देण आहे. याचे योग्य पद्धतीने नियोजन होणे गरजेचे आहे. एकेकाळी पाण्याने समृद्ध झालेली गावेच्या गावे योग्य नियोजन न झाल्याने पाण्याच्या अभावाने उजाड झालेली दिसून येतात. भविष्यात पाणी ही मूळ समस्या ठरल्यास नवल राहणार नाही. याचे भान ठेवून सिनेमा, नाटक एवढेच नव्हे तर तमाशाच्या कलावंतांनी पाणी समस्येमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीवर भाष्य करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. असाच प्रयत्न अमिर खान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सत्यमेव जयते वाटर कपच्या माध्यमातून पाणी फांउडेशनच्यावतीने करण्यात येत आहे. यासाठी सुमीत वानखेडे यांच्या आग्रहावरून नागपूर विभागातून केवळ आर्वी तालुक्याची निवड झाली आहे. आपले गाव समृद्ध व आदर्श बनविण्याकरिता पाणी फांउडेशनच्या कार्यकर्त्यांना मदत करा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, पं.स. सभापती शिला पवार, उपसभापती धर्मेंद्र राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश देशमुख, हृदय रोगतज्ज्ञ डॉ. अरुण पावडे, डॉ. रिप्पल राणे, डॉ. सचिन पावडे, प्रा. रवींद्र सोनटक्के, प्रशांत नेपटे, शंकर राठोड तथा ५२ गावातील सरपंच व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
संचालन मंदार देशपांडे यांनी केले तर आभार तहसीलदार पवार यांनी मानले. कार्यक्रमाला कुणाल परदेशी, रितेश लुणावत, कडू व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)