बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज - बच्चू कडू
By Admin | Updated: April 15, 2016 02:35 IST2016-04-15T02:35:16+5:302016-04-15T02:35:16+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात देशाच्या हिताला प्राधान्य दिले. जात, धर्माच्या पहिले त्यांनी देश पाहिला.

बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज - बच्चू कडू
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात देशाच्या हिताला प्राधान्य दिले. जात, धर्माच्या पहिले त्यांनी देश पाहिला. त्यांच्या विचाराला कृतीत उतरविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने शहरातील पोलीस ग्राऊंड येथे बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
मंचावर तहसीलदार राहुल सारंग, संयोजक प्रमोद राऊत, आयबीएन लोकमतचे वरिष्ठ पत्रकार विनोद राऊत, सामाजिक कार्यकर्ते सफदर अली, समितीचे अध्यक्ष विशाल रामटेके व अतुल दिवे विराजमान होते.
घटनेद्वारे समता, बंधूता निर्माण करण्याचे स्वप्न बाबासाहेबांचे होते. आपला देश प्रजासत्ताक देश आहे. म्हणजे प्रजेची सत्ता. मात्र आज नोकरशाही, नेते राजे झालेत आणि प्रजा त्याची गुलाम झाली आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील समता खऱ्या अर्थाने आणण्यासाठी आपल्याला काम केले पाहिजे, असे आवाहनही आ. कडू यांनी केले. जन्माने नाही तर कर्तृत्वाने भीमसैनिक आहे, असेही ते म्हणाले. नोकरशाहीला ‘थप्पड’ का मारली हे सांगताना ते म्हणाले, जर शेतकऱ्यांचे काम होत नसेल, गरीबांचे काम होत नसेल, तर आम्ही काय करावे, असा सवालही यावेळी आ. कडू यांनी उपस्थित केला. तहसीलदार राहुल सारंग यांनी बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, स्वप्न प्रत्येकांत उतरविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जनतेला केले.