सामाजिक अस्मितेसाठी भाषा टिकवणे गरजेचे
By Admin | Updated: September 25, 2014 23:29 IST2014-09-25T23:29:30+5:302014-09-25T23:29:30+5:30
भाषा समाजाची अस्मिता, ओळख आणि संकेत म्हणून काम करते. भाषा मनुुष्याला समर्थ आणि सशक्त बनविते. भाषा युध्द आणि सलोख्याचे देखील काम करते. केवळ भाषांतराच्या भरवशावर कोणत्याही

सामाजिक अस्मितेसाठी भाषा टिकवणे गरजेचे
वर्धा : भाषा समाजाची अस्मिता, ओळख आणि संकेत म्हणून काम करते. भाषा मनुुष्याला समर्थ आणि सशक्त बनविते. भाषा युध्द आणि सलोख्याचे देखील काम करते. केवळ भाषांतराच्या भरवशावर कोणत्याही भाषेचा विकास होत नाही. मूळात त्या भाषेतील विचार, संस्कृती साहित्यासह अनेक शाखांच्या माध्यमातून पुढे आली पाहिजे. सामाजिक अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी भाषेचे अस्तित्व आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र यांनी केले.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. हिदी पंधरवड्यात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मणिकांत सोनी, कुलसचिव प्रा. देवराज, लेखक अरुणेश नीरन यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर बोलताना मणिकांत सोनी म्हणाले, हिंदी ही एक परिपूर्ण भाषा आहे. या भाषेत अभिव्यक्ती आणि प्रसारण सहज शक्य होते. अरुणेश नीरन यांनी भाषा आणि बोली यांचा अंतर्सबंध सांगताना भाषेमध्ये विकास तर बोलीमध्ये विश्वास अंतर्भूत असतो, असे स्पष्ट केले. बोली नदीच्या लाटांप्रमाणे असते. बोलीतील शब्दसंपदा भाषेत आली तर भाषा समृध्द होते.
हबीब तन्वीर सभागृहात विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना कुलगुरूंच्या हस्ते रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले. वादविवाद स्पर्धेचा प्रथम पुरस्कार सहायक कुलसचिव डॉ. राजेश्वर सिंग, द्वितीय पुरस्कार रामप्रसाद कुमरे तर तिसरा पुरस्कार वेद प्रकाश यांना देण्यात आला.
निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार उमाशंकर बघेल, द्वितीय वेद प्रकाश, तर तृतीय अमन एस. ताकसांडे यांना देण्यात आला. हिंदी टंकन स्पर्धेचा प्रथम पुरस्कार विजय यादव, द्वितीय रामप्रसाद कुमरे, तर तृतीय अश्विनी राठोड यांना तर प्रोत्साहनपर पुरस्कार हर्षदा क्षीरसागर, मनोज मानापुरे यांना देण्यात आला.
काव्य वाचन स्पर्धेत प्रथम सुभाष श्रीवास्तव ठरले तर द्वितीय नटराज वर्मा, तृतीय अरुण प्रताप सिंग, तर प्रोत्साहनपर पुरस्कार गुंजन जैन यांना देण्यात आला. हिंदी सुलेखन स्पर्धेचा प्रथम पुरस्कार शरद बकाले, द्वितीय नीतेश बकाले, तर तृतीय पुरस्कार कल्पना चौधरी यांना व प्रोत्साहनपर पुरस्कार अरविंद देवलिया यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सहायक व्याख्याते राकेश मिश्र यांनी केले. हिंदी अधिकारी राजेश यादव यांनी आभार मानले. आयोजनाकरिता अध्यापक, कर्मचारी आदींनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)