बापूंचा जाहिरनामा स्वत: राबविण्याची गरज
By Admin | Updated: August 11, 2015 03:01 IST2015-08-11T03:01:48+5:302015-08-11T03:01:48+5:30
आश्रमात राहण्याचा आणि महापुरुषांचा सहवास लाभला. ‘हिंद स्वराज्य’ तीनदा वाचण्याचा प्रयत्न केल्यांनतर आता मात्र

बापूंचा जाहिरनामा स्वत: राबविण्याची गरज
अभय बंग यांचे विचार : सेवाग्राम आश्रमात क्रांतिदिनी व्याख्यान
सेवाग्राम: आश्रमात राहण्याचा आणि महापुरुषांचा सहवास लाभला. ‘हिंद स्वराज्य’ तीनदा वाचण्याचा प्रयत्न केल्यांनतर आता मात्र सदर पुस्तक समजू लागले. महात्मा गांधीजींनी १९०९ मध्ये हे पुस्तक लिहिले. जगातील एकंदरीत भांडवलशाही, हिंसा, पाश्चिमात्य संस्कृतीच्या भयानकतेचे दुष्परिणाम गांधीजींनी ओळखले होते. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील जाहिरनामा साकार करण्याची व्यक्तिगत पातळीवरुन सुरुवात व्हावी. जगात परिवर्तन व्हावे असे वाटत असले तरी स्वत:पासून याचा प्रारंभ केल्यास बापूंच्या जाहिरनाम्याची सुरुवात झाली, असे समजायला हरकत नाही, असे विचार डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.
यात्री निवासमध्ये भारत छोडो आंदोलन दिवसावर ‘हिंद स्वराज्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एकनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी व्याख्याते डॉ. बंग, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, मंत्री प्रा. डॉ. जाधव व गांधी विचार परिषदेचे भरत महोदय उपस्थित होते. मान्यवरांनी गांधीजींच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण केल्यानंतर प्रा. श्रीराम जाधव यांनी सूतमाळ व खादीची शाल देवून डॉ. बंग व प्रा. एकनाथ रोडे यांचे स्वागत केले.