वृक्ष लागवड करून वनक्षेत्र हिरवेगार करणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:54 IST2019-07-01T22:54:18+5:302019-07-01T22:54:41+5:30
वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पृथ्वीवरील वातावरणातील बदलाचा अंदाज काही वर्षांपूर्वीच तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, सध्या झपाट्यानेच पृथ्वीवरील वातावरणात बदल होत आहेत. हा बदल पाहता जागातील ४० टक्के शहरात २०४० पर्यंत पाणी राहणार नाही. फिलीपिन्स या देशात विद्यार्थ्यांना किमान दहा रोपटे लावून ती जगवून न दाखविल्याशिवाय त्यांना पदवी मिळत नाही.

वृक्ष लागवड करून वनक्षेत्र हिरवेगार करणे काळाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पृथ्वीवरील वातावरणातील बदलाचा अंदाज काही वर्षांपूर्वीच तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, सध्या झपाट्यानेच पृथ्वीवरील वातावरणात बदल होत आहेत. हा बदल पाहता जागातील ४० टक्के शहरात २०४० पर्यंत पाणी राहणार नाही. फिलीपिन्स या देशात विद्यार्थ्यांना किमान दहा रोपटे लावून ती जगवून न दाखविल्याशिवाय त्यांना पदवी मिळत नाही. भविष्यात चांगले दिवस बघावयाचे असेल तर प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. शिवाय वृक्ष लागवड करून वनक्षेत्र हिरवेगार केले पाहिजे. ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.
वनविभागातर्फे वनमहोत्सवाचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम नजीकच्या जंगलापूर परिसरात सोमवारी पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यापीठावर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपवनसरंक्षक सुनील शर्मा, तहसीलदार महेंद्र सोनवने, पं.स.सभापती जयश्री खोडे, जि. प. सदस्य विनोद लाखे, सेलूच्या नगराध्यक्षा शारदा माहुरे, महाबळा जंगलापूरच्या सरपंच जोत्सना पोहाणे, केळझरच्या सरपंच अर्चना लोणकर, शैलेन्द्र दप्तरी, अनिल देवतारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की, वृक्ष लागवडीमध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे. वृक्ष लागवड हा उपक्रम केवळ शासकीय न राहता तो एक लोकचळवळ झाली पाहिजे, असे सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जमिनीतील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यावर मात करण्याकरिता वृक्ष लागवड करणे आणि वृक्षाचे संगोपन करणे हे शासनासोबतच प्रत्येक नागरिकांची तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. भविष्यातील संकट लक्षात घेता प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत ही जबाबदारी स्विकारली पाहिजे, असे स्पष्ट केले. सदर कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून वृक्षारोपण केले. या उपक्रमात इंदिरा हायस्कूल महाबळा, यशवंत विद्यालय सेलू, दीपचंद विद्यालय सेलू, न्यू आर्टस् महाविद्यालय वर्धा, विद्याभारती कॉलेज सेलू, अभिनव कृषी तंत्र निकेतन कॉलेज हिंगणी आदी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदिप पेटारे यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी लावले रोपटे
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
८७.५२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट -सुनील शर्मा
यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यात ८७.५२ लाख वृक्षलावडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर आजपासून या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत सदर उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. शिवाय वनमहोत्सवाच्या काळात वृक्षलागवड झाल्यानंतर त्याचे आॅडीट होणार असल्याचे याप्रसंगी उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांनी सांगितले.