समाजातील दर्जेदार शिक्षणासाठी सृजनशील शिक्षकांची आवश्यकता
By Admin | Updated: March 2, 2016 02:35 IST2016-03-02T02:35:54+5:302016-03-02T02:35:54+5:30
प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेत प्राध्यापकांची घोडदौड विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या शैक्षणिक कामगिरी निर्देशांकानुसार (एपीआय स्कोअर)

समाजातील दर्जेदार शिक्षणासाठी सृजनशील शिक्षकांची आवश्यकता
गिरीश्वर मिश्र : दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप
वर्धा : प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेत प्राध्यापकांची घोडदौड विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या शैक्षणिक कामगिरी निर्देशांकानुसार (एपीआय स्कोअर) अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी सुरू आहे. या कारणास्तव शैक्षणिक दर्जा सुधारण्याऐवजी प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होत आहे. दर्जेदार शिक्षणासाठी प्राध्यापकांमध्ये सृजनशीलता वाढणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गिरिश्वर मिश्र यांनी केले.
स्थानिक यशवंत महाविद्यालयात नॅक प्रायोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. महाविद्यालयाचे आयक्वॅक समन्वयक डॉ. विलास ढोणे मंचावर उपस्थित होते. डॉ. मिश्र म्हणाले, शिक्षक हे प्रगतीशील समाजाचे आधारस्तंभ आहेत. समाजाच्या जडणघडणीत त्यांचा कार्यभार मोठा आहे. ही जबाबदारी ओळखून प्राध्यापकांनी समाज शिक्षक म्हणूनही कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले, महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय चर्चासत्राच्या विषयतज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण करण्यासाठी नॅक संस्था कार्यरत आहे. महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी प्राध्यापकांबरोबरच, शिक्षण संस्थेची प्रशासकीय व्यवस्था, पालक व विद्यार्थी यांच्यात योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. शिक्षण संस्थेची प्रशासकीय व्यवस्था, पालक व विद्यार्थी यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आयक्वॅकचे सह-समन्वयक प्रा. एस.एम. खान यांचा सत्कार करण्यात आला. नागपूरच्या अन्नासाहेब गुंडेवार महाविद्यालयाच्या आयक्वॅक समन्वयक डॉ. वर्षा ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. क्षिप्रा सिंघम व डॉ. रविशंकर भोर यांनी केले. आयोजनासाठी डॉ. उत्तम पारेकर, प्रा. भोयर, प्रा. देशमुख, डॉ. बोबडे, डॉ. निंबाळकर, डॉ. भुगूल, प्रा. नारायणे, प्रा. बेले, प्रा. लोहकरे, डॉ. बेंडले, डॉ. खोडे, प्रा. चव्हाण, डॉ. धोटे, प्रा. सिंदूरकर, प्रा. मुरकुटे इत्यादींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)