विनयभंगाचा गुन्हा झाला ‘एनसी मॅटर ’
By Admin | Updated: September 1, 2014 00:08 IST2014-09-01T00:08:20+5:302014-09-01T00:08:20+5:30
शौचास गेलेल्या महिलेचा हात धरून तिच्याशी कुकर्म करण्याचा प्रयत्न सिरसगाव (धनाढ्य) येथे करण्यात आला. या संदर्भात सदर महिला तक्रार देण्याकरिता वायगाव (निपाणी) येथील पोलीस

विनयभंगाचा गुन्हा झाला ‘एनसी मॅटर ’
वायगाव (नि.) : शौचास गेलेल्या महिलेचा हात धरून तिच्याशी कुकर्म करण्याचा प्रयत्न सिरसगाव (धनाढ्य) येथे करण्यात आला. या संदर्भात सदर महिला तक्रार देण्याकरिता वायगाव (निपाणी) येथील पोलीस चौकीत गेली असता तेथील पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल न करता सदर प्रकारात एनसी (नॉन काँगिजेबल) मॅटर म्हणून नोंद केली. यामुळे संतापलेल्या महिलेने या प्रकरणी गावकऱ्यांसह पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
सिरसगाव (ध.) येथील महिला २७ आॅगस्ट रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास शौचाकरिता गेली होती. दरम्यान रत्नाकर मधुकर चाफले रा.सिरसगाव (ध.) त्या महिलेच्या मागे जाऊन तिची छेड काढली. सदर महिलेने आरडाओरड केली असता परिसरातील ग्रामस्थ धावत आले. गावकऱ्यांना पाहून रत्नाकर याने घटनास्थळावरून पळ काढला. शिवाय रत्नाकर इतर महिलांनाही असाच त्रास देत असल्याचे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
झालेल्या प्रकाराची तक्रार सदर महिलेले देवळी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या वायगाव(नि.) पोलीस चौकीत दिली; मात्र येथील कार्यरत असलेल्या पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारीला एनसी तक्रार म्हणून नमूद केली. विनयभंगाच्या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाकडून हयगय होत असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)