ऐतिहासिक वास्तूला उकिरड्याचे स्वरुप
By Admin | Updated: November 22, 2014 23:07 IST2014-11-22T23:07:02+5:302014-11-22T23:07:02+5:30
येथील भोसलेकालीन अतिप्राचीन सराय सध्या कचरा साठविण्याचे ठिकाण होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची

ऐतिहासिक वास्तूला उकिरड्याचे स्वरुप
नाचणगाव : येथील भोसलेकालीन अतिप्राचीन सराय सध्या कचरा साठविण्याचे ठिकाण होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
किल्ल्याच्या वास्तुसारखी दिसणारी ही सराय ऐतिहासिक आठवणींना उजाळा देते. ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या वास्तूला काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याने बागेचे स्वरूप दिले होते. यामध्ये विविध प्रकारची झाडे लावून सर्वांचे लक्ष वेधले होते; परंतु त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे डोळेझाक केली. सध्या या ऐतिहासिक वास्तूत कचरा पसरला आहे.
आज सर्वत्र स्वच्छता अभियान सुरू असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र त्यापासून दूर असल्याचे चित्र आहे. या वास्तूच्या दारातच कचऱ्याचे ढीग पडून दिसत आहे. वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वत्र कचरा दिसून येतो. जिल्ह्यात पुरातन वास्तू तशा कमी आहेत. त्यात गावातील अतिप्राचीन वास्तू म्हणजे गावाचे वैभव ठरत आहे. अशा वैभवाची दुरवस्था ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. तरी ग्रा.पं. प्रशासनाने याची त्वरीत दखल घेवून स्वच्छता करण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून स्वच्छता अभियानाचे सार्थक होईल. ही वास्तू स्वच्छ करून येणाऱ्या जाणाऱ्यांकरिता ती पाहण्याकरिता खुली करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)