पालकमंत्र्यांच्या निर्देशांना राष्ट्रीयकृत बँकांचा कोलदांडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2015 02:07 IST2015-05-16T02:07:21+5:302015-05-16T02:07:21+5:30
शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्जवाटप करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून दिले होते.

पालकमंत्र्यांच्या निर्देशांना राष्ट्रीयकृत बँकांचा कोलदांडा
आकोली : शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्जवाटप करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून दिले होते. त्यांच्या आदेशाला मात्र राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांकडून बगल देण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. गरज नसताना शेतकऱ्यांना नो-ड्यू सर्टफिकेट मागितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खरीपाचा हंगाम शेतकऱ्यांना खुनावू लागला आहे. पावसाळा उंबरठ्यावर आला आहे. शेतकरी आपली शेती हंगामाची कामे करून बँकाचे कर्जासाठी उंबरठे झिजवित आहे. खरीपाच्या सोईकरिता वेळेवर घाई नको म्हणून शेतकरी कर्ज मिळविण्यासाठी धडपडत आहे. सुकळी (बाई), जामनी, मसाळा, मदनी, आमगाव, बोरखेडी इत्यादी गावे बँक आॅफ इंडिया शाखा सुकळी (बाई) च्या कार्यक्षेत्रात येतात. अनेक शेतकरी या बँकांचे नियमित कर्जदार आहे. तेव्हा त्यांना सुलभ पद्धतीने कर्जवाटप होणे अपेक्षित आहे.
बँक आॅफ महाराष्ट्र शाखा आंजी, अलाहाबाद बँक येळाकेळी, सेंट्रल बँक आॅफ इंडिया झडशी, आंध्रा बँक, मांडवा व संबंधित सेवा सहकारी संस्थाचे नो-ड्यू मागितले जात आहे. आर्थिक विवंचनेत होरपळलेला शेतकरी उन्हाचे चटके खात या बँकेतून त्यास बँकेत जातानी दमछाक होत आहे.(वार्ताहर)