राष्ट्रीय एकता दिनी धावले अवघे वर्धेकर
By Admin | Updated: November 1, 2015 02:30 IST2015-11-01T02:30:38+5:302015-11-01T02:30:38+5:30
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून वर्धेकरांनी शनिवारी राष्ट्रीय एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

राष्ट्रीय एकता दिनी धावले अवघे वर्धेकर
एकता दिवसानिमित्त दौड : पोलिसांसह युवक व होमगार्डचा उत्स्फूर्त सहभाग
वर्धा : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून वर्धेकरांनी शनिवारी राष्ट्रीय एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेऊन सरदार पटेल यांना अभिवादन केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे ‘रन फॉर युनिटी’ (एकता दौड) चे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात आले. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त जिल्हा श्ल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार राहुल सारंग, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य नागभूषण उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलावर सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, एनसीसी कॅडेट, महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी यांनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त देशहितार्थ शपथ घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा यांनी राष्ट्रीय एकता दौडला हिरवी झेंडी दाखविली.
जिल्हा क्रीडा संकूल, इतवारा चौक, सुभाषचंद्र बोस पुतळा, बाजार परिसर, धान्य बाजार, मुख्य मार्ग, निर्मल बेकरी चौक, बाजार मार्ग, अंबिका हॉटेल चौक, सरदार वल्लभभाई पटेल पुतळा यामार्गे दौड काढण्यात आली. पटेल चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अतिथींच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनीही पुष्पार्पण केले. अभिवादनानंतर दौड जिल्हा क्रीडा संकुलावर एकत्रित आल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.(प्रतिनिधी)