पिपरी(पो.) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ या मार्गावर वर्धा जिल्ह्यातील वडनेर ते यवतमाळ जिल्ह्यातील वडकीपर्यंत खड्ड्यांची मालिका बघायला मिळते. या मार्गाने प्रवास केल्यास जिवंतपणीच मरणयातना सहन कराव्या लागतात. अर्धवट बांधकामामुळे वाहतुकीची कोंडी नेहमीचीच समस्या झाली असून अपघातातही वाढ झाली आहे. या गंभीर समस्येबाबत मात्र संबंधित विभाग सुस्त आहे.या मार्गाने जड वाहतूक होत असल्याने रस्ता लवकर उखडतो. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत असल्याने रस्त्यावर डबके तयार होते. मार्गक्रमण करताना चालकांना चांगलीच कसरत होत आहे. रस्त्याचे बांधकाम ठप्प झाल्याने साहित्य रस्त्याच्या कडेला पडून आहे. रेतीवरून वाहन घसरल्याने किरकोळ अपघात नेहमीचेच झाले आहे. ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले, परंतु विभागाला जाग आली नाही. या भागात वाहतूक वळणमार्गाने वळविली असली तरी रस्ता अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते. या मार्गाचे काम बांधकाम त्वरीत पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
राष्ट्रीय महामार्ग-७ ने जिवंतपणीच मरणयातना
By admin | Updated: July 28, 2014 23:42 IST