कारवाईच्या नावावर ‘त्या’ विभागाचे केवळ ‘फोटोसेशन’
By Admin | Updated: October 24, 2016 00:32 IST2016-10-24T00:32:01+5:302016-10-24T00:32:01+5:30
जिल्ह्यात दारूबंदी असून अवैध दारूविक्रीला आळा बसावा, त्यावर अंकुश असावा याकरिता स्वतंत्र असा दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग आहे.

कारवाईच्या नावावर ‘त्या’ विभागाचे केवळ ‘फोटोसेशन’
दारूबंदीचे धिंडवडे : कारवाईत तीन जिल्ह्यांचा सहभाग
आकोली : जिल्ह्यात दारूबंदी असून अवैध दारूविक्रीला आळा बसावा, त्यावर अंकुश असावा याकरिता स्वतंत्र असा दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग आहे. असे असले तरी हा विभाग निष्क्रीय असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी घडला. कारवाईच्या नावावर इतरत्र विखुरलेले ड्रम एका ठिकाणी गोळा करून फोटोसेशन करण्यात आले. यानंतर कारवाईचा बनाव करण्यात आल्याचे उघड झाले.
दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी अवैध गावठी दारू अड्ड्यावर धडक मोहीम राबवली होती. विभागीय भरारी पथकाचे कैकाडे, मते यांच्या नेतृत्वातील या मोहिमेत अमरावती भरारी पथकाचे बेदरकर, नागपूर पथकाचे मोहतकर, वर्ध्याचे डी.बी. कोळी व कामुटे या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात २५ कर्मचारी सहभागी झाले होते. आकोली नजीकच्या अवैध गावठी दारू अड्ड्यावर धाडीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रथम पोटपूजा केली. तेथे हातगाडीवर असलेल्या भुईमुगांच्या भाजल्या शेंगांवर ताव मारला. तोपर्यंत दारूविक्रेत्यांना सवड मिळाली व त्यांनी गावठी दारूने भरलेल्या डबक्या घेऊन जंगलाकडे पोबारा केला. शेवटी विखुरलेले रिकामे ड्रम गोळा करून फोटो काढले व चालते झाले. अशाने दारूबंदी होणार काय, हा प्रश्नच आहे.
दारूबंदी व्हावी म्हणून महिलांनी एल्गार पुकारला. वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून महिला काय करीत आहे. पोलीस प्रशासनही सहकार्य करीत आहे; पण दारूबंदी उत्पादन शुल्क हा स्वतंत्र विभाग कारवाईच्या नावावर थोटांग करताना दिसतो. ही कारवाई पाहून ग्रामस्थांची चांगली करमणूक झाली.(वार्ताहर)