समता आधारित समाजाकरिता नई तालीम
By Admin | Updated: November 17, 2016 00:51 IST2016-11-17T00:51:35+5:302016-11-17T00:51:35+5:30
नई तालीम म्हणजे मन, बुद्धी, हात आणि हृदय याचा सर्वांगीण विकास होय. समता आधारित समाजाकरिता नई तालीम शिवाय दुसरा पर्याय नाही,

समता आधारित समाजाकरिता नई तालीम
सुगन बरंठ : कार्यशाळेत देशभरातून प्रतिनिधींची उपस्थिती
सेवाग्राम : नई तालीम म्हणजे मन, बुद्धी, हात आणि हृदय याचा सर्वांगीण विकास होय. समता आधारित समाजाकरिता नई तालीम शिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन डॉ. सुगन बरंठ यांनी केले.
सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रीय परिसंवाद घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी चर्चासत्र व परिसंवादात सहभाग घेतला.
शरीर, मन, बुद्धीचा सर्वांगीण विकास आणि उद्योगमूलक शिक्षण केंद्रस्थानी धरून नई तालीमचा प्रारंभ झाला. जीवनातून, जीवनाकरिता आणि जीवनाच्या अंतिमतेपर्यंत शिक्षणाचा व्यापक विचार अहिंसक व शाश्वत समाजाच्या निर्मितीकरिता महत्वाचा मानला. नई तालीम म्हणजे जीवनाचे पोषण आणि स्वावलंबी विचार करायला लावणारी शिक्षण पध्द्धतीे आहे, असे यावेळी बरंठ यांनी सांगितले.
या कार्यशाळेत दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातून ६७ प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिसंवादात समता आधारित शिक्षणाची रचना, दिशा आणि कार्याची प्रक्रिया या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. आनंद निकेतन विद्यालयाच्या एका दशकातील अनुभव सुषमा शर्मा, गुणवत्तापूर्ण सार्थक शिक्षण अभियानाची फलश्रुती प्रभाकर पुसदकर यांनी सांगितली. डायटच्या समन्वयातून झालेले कार्य याचे सादरीकरण सीमा पुसदकर, किरण धांडे, विद्या वालोकर, देवेंद्र गाठे, भंडागे गुरूजी, वैशाली चिकटे, सीमा मेहता यांनी केले. सामुहिक चर्चेतून नवी दिशा कशी असेल यावर चिंतन केले.
या परिसंवादात मीनाक्षी व उमेश भाई, दिल्ली विद्यापीठाच्या अनिता रामपाल, राजीव गांधी फाऊंडेशनचे दीपक चंद्रा, सचिन राव, मितु आर्यनायकम, सुमितो घोष, शिवदत्त, डॉ. सुगन बरंठ, प्रदीप दासगुप्ता, सुषमा शर्मा, प्रा. सीमा पुसदकर, डॉ. किरण धांडे, नारायणदादा, शंकर बगाडे, अंतर्यामी कृष्णाजी, मृणालिनी सपकाळ, अनिल फरसोले, माधव सहत्रबुध्दे, प्रभाकर पुसदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या परिसंवादातून नई तालीमचा व्यापक प्रचार व प्रसार करण्याकरिता विविध राज्यात कार्य करण्याचे निश्चित केले. शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी प्रयत्नातून विकसित होत असलेली गुणवत्ता, सार्थक शिक्षणाचे मॉडेल्स ही नई तालीमच्या कामाची दिशा होईल या दृष्टीने कार्य नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप दासगुप्ता यांनी केले. शिवचरण ठाकूर, संदीप भगत, अनिल पेंदाम, पवन, रूपेश कडू व आनंद निकेतनच्या शिक्षकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)