नगर पंचायतीत काँग्रेसची मुसंडी
By Admin | Updated: November 3, 2015 02:38 IST2015-11-03T02:38:32+5:302015-11-03T02:38:32+5:30
जिल्ह्यातील चारही नगर पंचायतीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालाने जिल्ह्यात काँग्रेसचे बळ कायम असल्याचे

नगर पंचायतीत काँग्रेसची मुसंडी
वर्धा : जिल्ह्यातील चारही नगर पंचायतीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालाने जिल्ह्यात काँग्रेसचे बळ कायम असल्याचे दिसून आले. आष्टी (शहीद) व कारंजा (घाडगे) येथे काँग्रेसने एकतर्फी सत्ता काबीज केली. तर सेलूत भाजपच्या बडंखोर आघाडीने सर्वाधिक सहा जागा मिळविल्या. येथे एकाही पक्षाला बहुमत नसून मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. समुद्रपूरात भाजप सर्वाधिक आठ जागा जिंकून मोठा पक्ष ठरला आहे. बहुमतासाठी एका सदस्याची गरज आहे.
समुद्रपूर नगर पंचायतमध्ये भाजपला सर्वाधिक आठ जागा जिंकता आल्या. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ४, सेना व बसपा प्रत्येकी १, तर अपक्षांनी ३ जागा बळकावल्या. यापूर्वी ग्रामपंचायतीवर भाजपाचीच सत्ता होती. आता येथे भाजपला सत्ता स्थापन्यासाठी एका सदस्याची गरज भासणार आहे. सेलूमध्ये एकाही पक्षाला बहुमत नाही. भाजपला शैलेश दफ्तरी यांची बंडखोरी महागात पडली. येथे भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. दफ्तरी आघाडीने सर्वाधिक ६ जागा जिंकल्या. काँग्रेसला ५, बसपा १ तर अपक्षाला दोन जागा मिळाल्या. सेलू ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात होती. या निवडणुकीत मात्र काँग्रेसला सत्ता राखता आली नाही.
आष्टीमध्ये काँग्रेसने १० जागांवर विजय संपादन करीत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपला केवळ ६ जागांवरच समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली. ग्रामपंचायत असता सर्वाधिक सदस्य भाजपचे आणि सरपंच काँग्रेसचा, अशी स्थिती होती. येथे आता काँग्रेसने भाजपला चांगलीच पटकणी दिली. कारंजात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. तब्बल १५ जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता मिळविली आहे. भाजपला केवळ २ जागांवरच समाधान मानावे लागले. चारही नगर पंचायतीच्य आजी-माजी आमदारांनी कंबर कसली होती. त्यांच्या क्षेत्रात त्यांचे किती प्राबल्य आहे, हे निकालाने दाखविले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपची लाट ओसरल्याचे संकेतच मिळाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
समुद्रपूर सेलूत सत्तास्थापनेकरिता बहुमताची कसरत
नगरपंचायतीत सत्ता स्थापन करण्याकरिता किमान संख्याबळ ९ आवश्यक आहे. समुद्रपूर येथे भाजपाला ८ जागांवर विजय मिळविता आला. यामुळे सत्ता स्थापनेकरिता त्यांना आणखी एकाची गरज आहे. यात सेना त्यांच्या सोबत जाईल असे बोलले जात आहे. सेलू नगरपंचायतीत अपक्ष असलेल्या गटाला, काँग्रेस वा भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. यामुळे येथे सत्तेत कोण येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपातून बंडखोरी करून पॅनल निवडून आणणारा दप्तरी गट पुन्हा भाजपासोबत जाईल वा काँग्रेसच्या जयस्वाल गटाशी हातमिळवणी करणार याकडे सेलूच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारंजा व आष्टी तालुक्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. येथे साऱ्यांचे लक्ष आता रोस्टरकडे लागले आहे.
३१९ उमेदवार होते रिंगणात
या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण ३१९ उमेदवार रिंगणात होते. रविवारी झालेल्या ७७ टक्के मतदानानंतर सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत एकाएका वॉर्डाच्या जागांचा निकाल जाहीर होत गेला. येथूनच विजयी पक्षाच्यावतीने जल्लोष साजरा करणे सुरू झाले.
नगर पंचायतीतील पक्षांची स्थिती
काँग्रेस ३०
भाजपा १९
राकाँ. ०४
शिवसेना ०१
दप्तरी आघाडी०६
अपक्ष ०८
समुद्रपुरात भाजप वरचढ
समुद्रपूर : येथील नगर पंचायतीत भाजपाला ८ जागा प्राप्त झाल्या असून बहुमताला एक उमेदवार कमी पडत आहे. आ. समीर कुणावार यांना या विजयाचे श्रेय दिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. सत्ता स्थापन करण्याकरिता भाजपला एका उमेदवाराची गरज आहे. यामुळे येथे अपक्षांचे भाव वधारणार असल्याचे चित्र आहे. येथे काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.
भाजपकडून रिंगणात असलेल्या सुषमा चिताडे, ताराबाई अडवे, इंदु झाडे, रविंद्र झाडे, गजानन राऊत, शीला सोनारे, वर्षा बाभुळकर, प्रवीण चौधरी यांनी विजय मिळविला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरिता लोहकरे, आशिष अंड्रस्कर, मधुकर कांबळी, हर्षा डगवार विजयी झाले. शिवसेना व बसपाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. यात सेनेच्यावतीने पंकज बेलेकर तर बसपाच्या आशा वासनिक यांनी बाजी मारली. अपक्ष उमेदवार वनिता कांबळे, सुनिता सुरपाम व अंकुश आत्राम विजयी झाले. निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी भुगावकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन यादव, भलावी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निवडणुकीत शांतात व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी व वासुदेव सुर्यवंशी, ठाणेदार आर.टी. चव्हाण, मराठे, माहुरकर, अजय अवचट व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)