‘नभं उतरू आलं’ संगीत मैफलीने वर्धेकर रसिक मंत्रमुग्ध

By Admin | Updated: August 24, 2015 02:06 IST2015-08-24T02:06:28+5:302015-08-24T02:06:28+5:30

‘गार वारा हा भरारा, नभ टिपूस टिपूस, रानी-वनी पानोपानी, मन पाऊस पाऊस...’ या पावसाळ्यातील थंडगार गीताने सुरू झालेली मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

'Nabhon Bhalo Duaaala' Music Concert Wrestling Worshipers Rasheel Mausam | ‘नभं उतरू आलं’ संगीत मैफलीने वर्धेकर रसिक मंत्रमुग्ध

‘नभं उतरू आलं’ संगीत मैफलीने वर्धेकर रसिक मंत्रमुग्ध

मराठी-हिंदी पाऊस गाणी : सप्तरंग संगीत अकादमीचा संयुक्त उपक्रम; भावविभोर गीतांची आरास
वर्धा : ‘गार वारा हा भरारा, नभ टिपूस टिपूस, रानी-वनी पानोपानी, मन पाऊस पाऊस...’ या पावसाळ्यातील थंडगार गीताने सुरू झालेली मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. ऋतू हिरवा ऋतू बरवा..., अधिर मन झाले, मधूर घन आले...यासह पावसाच्या ओल्याचिंब गितांनी वर्धेकर रसिक न्हाहून निघाले. निमित्त होते, ‘नभं उतरू आलं’ या मराठी-हिंदी पाऊस गाणी मैफलीचे. या आगळ्या मैफलीने वर्धेकर रसिक अक्षरश: भावविभोर झाले.
स्थानिक सत्यनारायण बजाज वाचनालयात आनंद निधेकर निर्मित सप्तरंग संगीत अकादमी वर्धा प्रस्तुत व निसर्ग सेवा समिती, स.ब. सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय, वन व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नभं उतरू आलं’ ही मराठी-हिंदी पाऊस गाणी मैफल घेण्यात आली. उद्घाटन ज्येष्ठ संगीततज्ज्ञ जयंत मादुस्कर यांच्या हस्ते खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. यावेळी उपवन संरक्षक मुकेश गणात्रा, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रवीण बडगे, मुरलीधर बेलखोडे, प्रदीप बजाज, गौरीशंकर टिबडीवाल आदी उपस्थित होते. मैफलीत सप्तरंग प्रमुख आनंद निधेकर, स्वाती निधेकर, दिलीप मेने, उल्हास गोलाईत, सुधीर गिऱ्हे, भारती कदम, अवंतिका ढुमणे या प्रमुख गायकांसह योगीता झाडे, मयूर पटाईत या सहगायकांनी एकापेक्षा एक सुमधूर मराठी व हिंदी गीते सादर केली. सुमधूर पाऊस गाण्यांसोबतच किरण खडसे यांच्या साक्षी डान्स अकादमीच्या मुलींनी मनमोहक नृत्य सादर करून रंगत आणली.
या कार्यक्रमात तज्ज्ञ वादक प्रशांत उमरे सिंथेसाईजर, राजेंंद्र झाडे आक्टोपॅड, विशाल लिड गिटार, लेखी बेसगीटार, रवी खंडारे बासरी, अशोक तोकलवार तबला ढोलक, विकास वाटकर परक्यूशन यांनी उत्तम साथसंगत केली. कार्यक्रम निर्मितीसाठी प्रा. सुनील अंभोरे व दिलीप मेने यांनी सहकार्य केले. ध्वनी व प्रकाश व्यवस्था प्रशांत कोल्हे यांनी सांभाळली. भविष्यातही विविध संगीतकारांच्या सुमधूर रचना व विविध विषय घेऊन दर्जेदार गीतांचा कार्यक्रम सादर करण्याचा मानस कलावंतांनी व्यक्त केला.(कार्यालय प्रतिनिधी)
खुमासदार गीतांनी घेतला रसिकांच्या मनाचा ठाव
गार वारा हा भरारा या सुमधूर गीताने प्रारंभ झालेली पाऊस गाणी ही मैफल उत्तरोत्तर रंगली. यात ऋतू हिरवा, ऋतू बरवा, अधिर मन झाले यासह अन्य मराठी तर ओ सजना बरखा बहार आयी, ये रात भिगी भिगी, दिवाना हुआ बादल आदी हिंदी गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मैफलीचा शेवट हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफल करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे...या सोनू निगम यांनी गायलेल्या निसर्ग गीताने करण्यात आला. संप्तरंगचे प्रमुख आनंद निधेकर यांनी हे गीत सादर करून निसर्ग आपला मित्र आहे, त्याच्यासोबत जीवनसफर करून आयुष्याचा मनमुराद आनंद प्रत्येकाने लुटावा, असा संदेश दिला.
पहिल्यांदाच शहरात एका विषयावरील गीतांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आल्याने तो रसिकांना मेजवाणीच ठरला. कार्यक्रमाला शहरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: 'Nabhon Bhalo Duaaala' Music Concert Wrestling Worshipers Rasheel Mausam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.