‘त्या’ इसमाच्या मृत्यूचे रहस्य कायमच
By Admin | Updated: February 5, 2017 00:32 IST2017-02-05T00:32:05+5:302017-02-05T00:32:05+5:30
तालुक्यातील सेवा-तांबारी शिवारात आळलेल्या त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही.

‘त्या’ इसमाच्या मृत्यूचे रहस्य कायमच
पोलिसांकडून घटनास्थळाचे पुन्हा अवलोकन
समुद्रपूर : तालुक्यातील सेवा-तांबारी शिवारात आळलेल्या त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही. यामुळे त्याच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह ठाणेदारांनी घटनास्थळाचे पुन्हा अवलोकन केले. यात त्यांच्या हाती काय आले, याची माहिती देण्यास मात्र पोलिसांकडून नकार देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.
शुक्रवारी आढळलेला मृतदेह कुजलेला असून त्याच्या हातापायाचे पंजे नसल्याचे दिसून आले. यामुळे सदर इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याकरिता मृतदेह येथे टाकण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे, समुद्रपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण मुंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.
सदर प्रकरणी माहिती घेण्यासाठी तपासी अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्याच काही बोलणे शक्य नसल्याचे सांगितले. सध्या मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. लवकरच या प्रकरणातील रहस्याचा उलगडा होऊन वास्तव बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले. तपासाकरिता समद्रपूर पोलिसांनी आसपासच्या परिसरात चौकशी सुरू केली आहे. यात लवकरच यश येवून प्रकरणाचा खुलासा होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.(तालुका प्रतिनिधी)