मुस्लीम भगिनी मेळावा
By Admin | Updated: April 29, 2016 02:06 IST2016-04-29T02:06:27+5:302016-04-29T02:06:27+5:30
चेतना-विकास गोपुरी वर्धाच्या वतीने स्थानिक ग्रामपंचायतमध्ये मुस्लीम भगिनी मेळावा घेण्यात आला.

मुस्लीम भगिनी मेळावा
कायद्यासह विवाहांबाबत मार्गदर्शन
गिरड : चेतना-विकास गोपुरी वर्धाच्या वतीने स्थानिक ग्रामपंचायतमध्ये मुस्लीम भगिनी मेळावा घेण्यात आला. संस्थेच्या महिला विभाग प्रमुख सूमन बंग यांच्या मार्गदर्शनात हा मेळावा घेण्यात आला.
चेतना-विकास संस्थेच्या परिचय व प्रास्ताविक ज्येष्ठ कार्यकर्त्या शिला लामसे यांनी केले. अॅड. शाहीन शेख यांनी मुस्लीम कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. यात मुस्लीम महिला हक्क संरक्षण कायदा १९८६, मुस्लीम विवाह विच्छेदन अधिनियम १९३९ तसेच १२५ अंतर्गत मुस्लीम महिलेचे दुसरे लग्न होइपर्यंत पतीकडे खावटी मागण्याचा हक्क आहे, असे सांगितले. मेहेर ठरविल्याशिवाय मुसलमान लग्न कायदेशीर होऊ शकत नाही, या विषयावरही अॅड. शाहीन शेख यांनी मार्गदर्शन केले.
समुपदेशक मनीषा यादलवार यांनी समाधान केंद्रात येणारी समस्याग्रस्त प्रकरणे कशी हाताळली जातात, त्याचे स्वरूप कसे असते, याबाबत माहिती दिली. हे सुरू असताना वाढत्या वयातील मुलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावेळी पालकांनी मुलाशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवाव्या व मुलांशी मैत्रीपूर्ण नाते जोपासावे, असे मार्गदर्शनही करण्यात आले.
सासू व सून नातेसंबंध अतिशय नाजुक असतात. या नात्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. दोघींनीही एकमेकींना समजून घेऊन कुटूंब मजबुत करावे, असे आवाहन समुपदेशक संगीता कपारे यांनी केले. उद्योग, व्यवसायाबाबत मार्गदर्शन करताना प्रारंभी लहान-लहान व्यवसाय करून मोठे उद्योग उभे करावे. यातून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्याप्रकारे करता येतो, असे विविध उदाहरणांसह शिला लामसे यांनी सांगितले. महिला बचत गटाच्या अध्यक्ष रिजवाना काझी यांनी असे कार्यक्रम मुस्लिम महिलांकरिता व्हावे, असे मनोगत व्यक्त केले.
संचालन चेतना विकासच्या सुपरवाईझर नलिनी जामुनकर यांनी केले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता कादीर यांच्यासह पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)