संशयावरुन पुन्हा एका विवाहितेची हत्या
By Admin | Updated: August 26, 2015 02:05 IST2015-08-26T02:05:07+5:302015-08-26T02:05:07+5:30
चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून विल्हेवाट लावण्याकरिता तिच्या खांडोळ्या करण्याचे प्रकरण ताजे असताना ...

संशयावरुन पुन्हा एका विवाहितेची हत्या
धपकी येथील थरार : स्वत:च्या शेतात हत्या करणाऱ्या पतीला अटक
सेलू: चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून विल्हेवाट लावण्याकरिता तिच्या खांडोळ्या करण्याचे प्रकरण ताजे असताना सेलू तालुक्यातील धपकी येथील एका पतीने सोमवारी दुपारी त्याच्या पत्नीची संशयावरून हत्या केली. शिवाय यातून आपली सुटका व्हावी म्हणून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सासरी जावून बसला; मात्र बयाणात असलेल्या तफावतीमुळे त्याचे बिंग फुटले.
दहेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या या घटनेतील मृतक महिलेचे नाव अर्चना चंद्रशेखर नखाते (३२) रा. धपकी असे असून मारेकऱ्याचे नाव चंद्रशेखर नखाते (३५) रा. धपकी असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंद्रशेखर याला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. त्याने स्वत:च्या मालकीच्या चारमंडळ येथील शेतात पत्नीशी वाद घालत लोखंडी पाईपने मारून ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलीस सुत्रानुसार, तालुक्यातील धपकी येथील चंद्रशेखर नखाते व त्याची पत्नी अर्चना यांच्यात चारित्र्याच्या कारणावरून वाद होता. अशात सोमवारी अर्चना शेतात गेली असता चंद्रशेखरही तिच्या मागावर गेला. यात शेतात दोघांत या कारणावरून वाद झाला. चंद्रशेखर याने लोखंडी पाईपने तिच्या डोक्यावर जबर वार केला. यात रक्ताच्या थारोळ्यात पडून तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पळ काढणाऱ्या पतीला दहेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह अर्चनाच्या माहेरी समुद्रपूर तालुक्यातील धोंडगाव येथे नेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रशेखरवर भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास दहेगाव (गो.) पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
हत्या करून गेला सासरी
चारमंडळ येथील स्वत:च्या शेतात पत्नीची हत्या करून मारेकरी चंद्रशेखर नखाते याने थेट सासर गाठले. येथे त्याने साळ्याशी बोलणी करताना तब्बल सहा वेळा मृतक अर्चनाच्या भ्रमणध्वणीवर संपर्क केला. ती उत्तर देत नसल्याने त्याने शेजाऱ्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत त्याला विचारणा करीत शेताकडे जाण्यास सांगितले. शेतात अर्चनाचा मृतदेहच आढळून आला. अर्चनाची हत्या स्वत: केली नसल्याचा बनाव करण्याकरिता त्याने हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले.
बयाणातील तफावतीमुळे गुन्हा उघड
चंदशेखर याने पोलिसांना दिलेल्या बयाणात तफावत आढळून येत असल्याने ही हत्या त्यानेच केल्याचा संशय उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांना आला. यावरून त्याची सखोल चौकशी केली असता ही हत्या त्यानेच केल्याचे कबुली दिल्याचे सांगण्यात आले.