पालिकेचा ‘एम-मित्र’ अडगळीत
By Admin | Updated: May 10, 2015 01:35 IST2015-05-10T01:35:58+5:302015-05-10T01:35:58+5:30
शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास गती मिळावी व काही आवश्यक सूचना देण्याकरिता ...

पालिकेचा ‘एम-मित्र’ अडगळीत
रूपेश खैरी वर्धा
शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास गती मिळावी व काही आवश्यक सूचना देण्याकरिता सहज सुलभ सोय म्हणून वर्धा नगर परिषदेने ‘एम-मित्र’ ही सुविधा सुरू केली होती. अशी सुविधा देणारी वर्धा पालिका राज्यातील पहिली ठरली होती. सुविधा सुरू होवून वर्षाचा कालावधी लोटत नाही तोच ती अडगळीत पडली आहे. यामुळे नागरिकांकरिता उपयोगी असलेली ही सुविधा कुचकामी ठरत आहे.
वर्धा नगर परिषदेत सत्तांतरण झाल्यानंतर भाजपाला अध्यक्षपद मिळाले होते. त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून पदभार सांळणाऱ्या अतुल तराळे यांच्या पुढाकाराने ही सुविधा सुरू करण्यात आली होती. तिचे लोकर्पण करण्याकरिता पालिकेच्यावतीने जंगी कार्यक्रम घेतला होता. ही सुविधा सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. यातून त्यांच्या समस्या सोडविण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. ही सुविधा सुरू करण्याकरिता पालिकेला दीड लाख रुपयांचा खर्च आला होता. एवढा खर्च करून सुरू केलेली ही अद्ययावत पद्धती पालिकेतील राजकरणामुळे निरुपयोगी ठरत आहे. राज्यभरात इ गव्हरनेस सुरू असताना वर्धा पालिकेच्यावतीने त्यापुढे पाऊल टाकत ही सुविधा सुरू केली. ‘एम मित्र’ या प्रक्रियेत तयार करण्यात आलेले अॅप्स वर्धेत अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकांनी तयार केलेले आहे. हे अॅप्स समस्येची माहिती घेण्याकरिता लाभदायक ठरणारे असे असताना पालिकेच्यावतीने ते केवळ राजकीय द्वेषापोटी अडगळीत टाकल्याची माहिती आहे. पालिकेत सध्या सत्तेत असलेल्यांना या प्रणालीचे महत्त्वच कळले नसल्याची चर्चा येथील काही कर्मचारी व पदाधिकारी दबक्या स्वरुपात करीत आहेत.