कार प्रकल्पग्रस्तांकरीता मुंडके दफन आंदोलन
By Admin | Updated: July 16, 2014 00:20 IST2014-07-16T00:20:17+5:302014-07-16T00:20:17+5:30
कारंजा तालुक्यातील कार प्रकल्पाची सन २००२ मध्ये निर्मिती झाली. त्यानंतर प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे याकरिता कालवे तयार करण्यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली.

कार प्रकल्पग्रस्तांकरीता मुंडके दफन आंदोलन
आर्वी : कारंजा तालुक्यातील कार प्रकल्पाची सन २००२ मध्ये निर्मिती झाली. त्यानंतर प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे याकरिता कालवे तयार करण्यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना एक रुपयाचाही मोबदला देण्यात आला नाही. या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा व आर्वी, आष्टी, कारंजा या तिनही तालुक्यात कोरडा दुष्काळ घोषित करण्यात यावा. या दोन मागण्यांकरिता प्रहारच्यावतीने मंगळवारी मुंडके दफन आंदोलन केले.
या आंदोलनात प्रहारचे जिल्हा संघटक बाळा जगताप यांनी खड्ड्यात आपले मुंडके गाडूून घेतले तर शरीरासह पायाचा भाग जमिनीच्या वर होता. या आंदोलनाची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय अधिकारी मनोहर चव्हाण तसेच उपविभागीय अभियंता काळे व पोलीस निरीक्षक चंद्रकांत चकाटे यांनी घटनास्थळ गाठत उपस्थितांशी चर्चा केली. कार प्रकल्पाची निर्मिती सुरू असताना प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी शेतकऱ्यांची अनुमती न घेता जमिनीवर अतिक्रमण केले. सुपिक जमिनीत खोदकाम करून जमिनीचा बहुतांश भाग पडिक करण्यात आला. चौदा ते पंधरा वर्षांचा कालखंड लोटत असताना एक रुपयाही शेतकऱ्यांना देण्यात आला नाही.
याकरिता आंदोलने व उपोषणे झाली पण प्रशासनाला जाग येत नाही म्हणून मुंडके दफन आंदोलन असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनास्थळी अधिकाऱ्यांनी येत्या एका महिन्यात आपसी वाटाघातीतून जमिनी विकत घेऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले.
प्रभारी उपविभागीय महसूल अधिकारी यांना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देऊन जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहिर करावा. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी. गुरांच्या वैरणाकरिता चारा डेपो सुरू करावे. अनुदानावर खते व बी-बियाने उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेतकरी शेतमजुरांसह कार प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची भर पावसातही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)