ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर सुरूच
By Admin | Updated: July 11, 2016 01:58 IST2016-07-11T01:58:56+5:302016-07-11T01:58:56+5:30
खेडी ओसाड पडत असून शहराकडे नागरिकांचे लोंढे वाढत आहे. जिल्ह्यात १ हजार ३७६ गावांची संख्या असून खेड्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८ लाख ७५ हजार २८४ एवढी आहे.

ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर सुरूच
जागतिक लोकसंख्या दिन : जिल्ह्याचा जन्मदर १३.४३ टक्के
श्रेया केने वर्धा
खेडी ओसाड पडत असून शहराकडे नागरिकांचे लोंढे वाढत आहे. जिल्ह्यात १ हजार ३७६ गावांची संख्या असून खेड्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८ लाख ७५ हजार २८४ एवढी आहे. २००१ मध्ये झालेल्या जनगणनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९ लाख ११ हजार ६९५ नागरिक वास्तव्यास होते. तर शहरातील आकडेवारी पाहता २००१ मध्ये ३ लाख २५ हजार ६९५ वरून ४ लाख २० हजार ८७३ एवढी वाढ झाल्याचे आकडे सांगत आहेत. गावांची संख्याही १ हजार ३८२ वरून १ हजार ३७६ झाली आहे.
ग्रामीण भागात शेती शिवाय दुसरा व्यवसाय नसल्याने रोजगाराची समस्या भेडसावते. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय तोट्यात असल्याने रोजगाराच्या शोधार्थ अनेकांनी शहर गाठले. शासनाकडून ग्रामीण रोजगार योजना राबविली जाते. योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरड होते. शिवाय मजुरीकरिता बेरोजगारांना कार्यालयात हेलपाटा माराव्या लागत असल्याच्या तक्रारी आहेत. तुलनेने शहरात रोजगार उपलब्ध होत असल्याने शहरांचा आकार दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येतो. क्षेत्रफळासोबत लोकसंख्येतही वाढत होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १२ लाख ९६ हजार १५७ आहे. यात ६ लाख ६५ हजार ९२५ इतके पुरूष तर ६ लाख ३० हजार २३२ महिलांची संख्या आहे. लोकसंख्येची घनता २०५ आहे. २००१ मध्ये लोकसंख्येची घनता १९६ इतकी होती. २०११ मध्ये लोकसंख्या वाढीच दर १४.४७ टक्के होता. २०१५ मध्ये हा दर १३.४३ टक्क्यांवर आला. असे असले तरी २००१ मध्ये केलेल्या जनगणनेतील आकडेवारी पाहता २०११ मध्ये जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली आहे. शहरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते.
गावांची संख्या घटली
२००१ पर्यंत जिल्ह्यातील गावांची संख्या १,३८२ होती. ती २०११ मध्ये १,३७६ पर्यंत आली आहे. जिल्ह्यात सहा नगरपालिका असून चार नगरपंचायत आहेत. या प्रत्येक शहरातील लोकसंख्येत गत १० वर्षात वाढ झाल्याचे दिसते.