सामाजिक उपक्रमांकडे मंडळांची वाटचाल
By Admin | Updated: September 27, 2014 01:52 IST2014-09-27T01:52:14+5:302014-09-27T01:52:14+5:30
जिल्ह्यात नवरात्रीच्या उत्सवाचे आगळे महत्त्व आहे. मोठ्या भक्तीभावाने आणि तेवढ्याच श्रद्धेने ...

सामाजिक उपक्रमांकडे मंडळांची वाटचाल
गोंदिया : जिल्ह्यात नवरात्रीच्या उत्सवाचे आगळे महत्त्व आहे. मोठ्या भक्तीभावाने आणि तेवढ्याच श्रद्धेने हा उत्सव साजरा केला जात असला तरी यातील काही अनावश्यक खर्चाच्या बाबी आणि बडेजावपणा टाळून तो पैसा सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्यासाठी आता काही मंडळे पुढाकार घेत आहेत. ‘लोकमत परिचर्चे’त सहभागी शहरातील प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब कबुल सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
गोंदियातील सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती गांधी पुतळा चौकचे अध्यक्ष महेश अग्रवाल, श्री टॉकीज दुर्गा उत्सव समितिचे अध्यक्ष महेंद्र जैन, वल्लभभाई चौक दुर्गा उत्सव समिती राजलक्ष्मी चौकचे अध्यक्ष मयूर दरबार, बंगाली असोसिएशन दुर्गा उत्सव समितीचे सुसेनजीत शाह, भास्कर बैनर्जी, मृत्युंंजय भट्टाचार्य आदी पदाधिकारी या चर्चेत सहभागी झाले होते.
देवीचा उत्सव मागील अनेक वर्षांपासून साजरा करीत असल्याने काही मंडळांनी नियमित वीज कनेक्शन तर काही लोकांनी केवळ उत्सवाकरिता तात्पुरते वीज कनेक्शन घेतले आहे. रस्त्यांवर किंवा रस्त्यालगत दुर्गा उत्सव मंडळाचे मंडप टाकले जातात. त्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत नाही का? असा प्रश्न केला असता लोकांना अडचण होईल अशा पद्धतीने कोणी मंडप टाकत नसल्याचे सांगितले आणि थोडी अडचण झाली तरी ती लोक आनंदाने सहन करतात. उत्सवात संगीताला अनन्यसाधारण महत्व असते. संगीताशिवाय जीवन व्यर्थ आहे म्हणून या उत्सवात ढोल-ताशे, भजन, संगीत यांचा गजर केला जातो. फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव कायद्याच्या चाकोरीत राहूनच केला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुर्गोत्सव साजरा करताना पोलिसांकडून व नगर परिषदेकडून सुचविलेल्या सूचनांचे पालन केले जाते. अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमावर वर्गणीचे पैसे खर्च करण्यावर आता भर दिला जात आहे. बंगाली असोसिएशनतर्फे दरवर्षी ३०० ते ५०० रोपट्यांचे रोपण केले जाते. सोबतच मोठ्या डॉक्टरांना पाचारण करून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते, असे सुसेनजीत शाह म्हणाले. वल्लभभाई दुर्गा उत्सव समितीकडून ५ हजार लोकांना महाप्रसाद दिला जात असल्याचे मयूर दरबार म्हणाले. ५१ वर्षांपासून या दुर्गादेवीची स्थापना आमच्या मंडळाकडून करण्यात येत आहे. रूग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही आमच्या मंडळाकडून पुढाकार घेत असल्याचे महेंद्र जैन म्हणाले. आम्ही आपल्या दुर्गा उत्सव समितीतर्फे ५०० ते ६०० विद्यार्थ्यांना भोजन, भेटवस्तु देत असतो. सोबतच मुलींना सक्षम करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो.
एकंदरीत नवदुर्गा उत्सव आनंददायी प्रेरणा देणारा असल्याने प्रत्येक जाती-धर्मांचे लोक या उत्सवात हिरीरीने भाग घेतात. संपूर्ण नऊ दिवसांचा कालावधी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघतो. गोंदिया शहरातील दुर्गा उत्सव मंडळाच्या सदस्यांना नगर परिषदेकडून मोठा त्रास असतो. नगर परिषदेकडून स्वच्छता होत नसल्यामुळे तसेच बेवारस जनावरांच्या मुक्ता संचारामुळे मोठी घटना घडण्याचे सावट नेहमीच डोक्यावर असते, त्याकडे न.प.प्रशासने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)