गोंडवाना राज्याच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन

By Admin | Updated: December 21, 2014 23:03 IST2014-12-21T23:03:37+5:302014-12-21T23:03:37+5:30

गोंडी समाजात धर्म विषयक जागृती करून गोंडवाना राज्याची पुनर्बांधणी करण्याकरिता या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी सर्व समाजबांधवांनी या कार्यात सहभागी होत

Movement for rebuilding of Gondwana state | गोंडवाना राज्याच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन

गोंडवाना राज्याच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन

वर्धा : गोंडी समाजात धर्म विषयक जागृती करून गोंडवाना राज्याची पुनर्बांधणी करण्याकरिता या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी सर्व समाजबांधवांनी या कार्यात सहभागी होत त्याला हातभार लावावा या विषयावर रविवारी वर्धेत झालेल्या चौथ्या गोंडी धर्म व संस्कृती संमेलनात सविस्तर चर्चा करण्यात आली.
पिपरी (मेघे) येथील शनी मंदिराच्या प्रांगणात उलगुलान आदिवासी व सांस्कृतिक मंच तथा गोंडवाना महिला जंगोम दलच्यावतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजात विशेष कार्य करणाऱ्या काही निवडक समाजबांधवांचा अतिथींच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
संमेलनात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिसिंग मरकाम, गोंडी धर्माचार्य मोतीराम कंगाले, प्रांताध्यक्ष वासुदेवशहा टेकाम, पार्टीचे प्रवक्ता मधुकर उईके, भीमा आडे, छत्तीसगड येथील लेखिका सुशीला धुर्वे, अमरावती येथील रावन चिपको आंदोलनाच्या नेत्या महानंदा टेकाम, ज्येष्ठ महिला सखुबाई दाभेकर, रेखाताई जुगनाके यांच्यासह समाजातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान विविध भागातून आलेल्या समाजाच्या प्रतिनिधींनी विचार व्यक्त करीत त्यांच्या भावना मांडल्या. समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्याने समाजबांधवांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोबतच गोंडी समाजाच्या अधिकाराकरिता सोमवारी नागपूर येथे आयोजित मोर्चात समाजबांधवांनी सहभागी होण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन रंजना उईके यांनी केले. प्रारंभी संभा कुमरे यांनी गोंडीगीत सादर केले. चर्चासत्रानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गोंडवाना जंगोम नृत्य कला केंद्र महादापूर व गोंडवाना जंगोम नृत्य कला संच भिवापूर (हेटी) येथील पथकाने नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता गोंडवाना युवा जंगोम दलाच्या सदस्यांनी सहकार्य केले. संमेलनात सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विविध भागातील पदाधिकारी विविध मार्गाने मिरवणुका काढून कार्यक्रम स्थळी पोहोचले.(प्रतिनिधी)

Web Title: Movement for rebuilding of Gondwana state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.