‘नो व्हेईकल डे’बाबत वर्धेकरांकडून हालचालींना वेग
By Admin | Updated: December 18, 2015 02:32 IST2015-12-18T02:32:54+5:302015-12-18T02:32:54+5:30
‘नो व्हेईकल डे’बाबत ‘लोकमत’ने घेतल्या ‘इनिशिएटिव्ह’चा प्रसार वर्धेत सर्वत्र झपाट्याने होत आहे.

‘नो व्हेईकल डे’बाबत वर्धेकरांकडून हालचालींना वेग
दिवसाबाबत उत्सुकता : जिल्हा व पोलीस प्रशासनही सकारात्मक, विविध संघटनांकडून ‘दिवस’ ठरविण्यासाठी पुढाकार
वर्धा : ‘नो व्हेईकल डे’बाबत ‘लोकमत’ने घेतल्या ‘इनिशिएटिव्ह’चा प्रसार वर्धेत सर्वत्र झपाट्याने होत आहे. वर्धेकर या विषयाची उत्सुकतेपोटी चर्चा करीत असून हा दिवस कोणता राहील, याकडे सर्वांचे लक्ष आहेत. दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांसह जिल्हा व पोलीस प्रशासनाकडूनही आठवड्यातला एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ निश्चित करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी ‘लोकमत’च्या या प्रस्तावाचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, जिल्हाधिकारी आशुतोष सलील साहेबसुद्धा याबाबत सकारात्मक आहे. नागपूरला अधिवेशनाला गेल्यामुळे शुक्रवारी याबाबतचा निर्णय घेतील, अशी संभावनाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना म्हणाले, ‘लोकमत’चा हा उपक्रम स्तुत्य आहे. एक दिवस सर्वांनी ठरवावा, त्या दिवसापासून जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी तो दिवस ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतील. वर्धा नगर परिषद मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करीत कर्मचाऱ्यांसह आपण हा दिवस अवश्य पाळू, असे कळविले. वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे म्हणाले, हा उपक्रम वर्धेकरांच्या आरोग्याशी आणि पर्यावरण संतुलन राखण्याच्यादृष्टीने मौलिक आहे. या उपक्रमात वैद्यकीय जनजागृती मंच सक्रिय सहभाग घेत ‘लोकमत’च्या या स्तुत्य प्रस्तावाचे स्वागत करीत आहे. वर्धेकरांनाही या उपक्रमात भाग घेऊन हा दिवस नेहमीसाठी पाळून आपले आरोग्य निरोगी ठेवावे. वर्धा एमआयडीसी असो.चे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ म्हणाले, या सामाजिक उपक्रमात पदाधिकारी व सदस्यांसह सक्रिय सहभाग राहील. वाढत्या प्रतिसादाने हा उपक्रम आता निर्णायक वळणावर आला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
‘नो व्हेईकल डे’बाबत रविवारी विविध संघटनांची बैठक, अनेकांचा वाढता होकार
‘आम्ही वर्धेकर’ व ‘वैद्यकीय जनजागृती मंच’चा पुढाकार
‘नो व्हेईकल डे’ आता कृतीतून राबविण्याबाबत अनेक सामाजिक, शैक्षणिक, कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत. या उपक्रमासाठी आठवड्यातील नेमका दिवस ठरविण्यासाठी ‘आम्ही वर्धेकर’ आणि ‘वैद्यकीय जनजागृती मंच’ने सक्रिय पुढाकार घेत येत्या रविवारी सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वर्धा येथे विविध संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्याचे ठरविले आहे. बैठकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हायचे आहे. वर्धेतील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘पर्यावरण वाचवा’चा संदेश देण्यासाठी सदर बैठकीला ठरलेल्या वेळेत उपस्थित राहून निर्णयात हातभार लावावा, असे आवाहन आम्ही वर्धेकर व बहार नेचरचे संजय इंगळे तिगांवकर व वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिव पावडे यांनी केले आहे.
न्यू इंग्लिश हायस्कूलच्या शिक्षकांनी दिले हमीपत्र
‘लोकमत’ची ‘नो व्हेईकल डे’ची संकल्पना प्रेरणा देणारी आहे. ही प्रेरणा घेत वर्धेतील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने मुख्याध्यापकांकडे हमीपत्र देत आम्ही आठवड्यातील एक दिवस ‘नो व्हेईकल डे’मध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचे कळविले आहे, अशी माहिती प्राचार्य विजय व्यास यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.