अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
By Admin | Updated: September 22, 2014 23:25 IST2014-09-22T23:25:00+5:302014-09-22T23:25:00+5:30
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, यासह प्रवास व सभेचा भत्ता याची बिले अप्राप्त आहे, संपकाळातील मानधन प्रलंबित असून या मागण्यांची

अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
वर्धा : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, यासह प्रवास व सभेचा भत्ता याची बिले अप्राप्त आहे, संपकाळातील मानधन प्रलंबित असून या मागण्यांची पुर्तता करण्यात शासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जाते. याविरोधात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने दिली.
यावेळी प्रशासनाला विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानुसार भाऊबीज भेटची तरतूद नाही, मानधन नाही आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांची पूर्तता विजयादशमीपूर्वी न झाल्यास जि.प. कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.
आशा वर्करला केंद्र सरकारने जाहीर केलेले जानेवारी २०१४ पासूनचे एक हजार रुपये मानधन मिळाले नाही, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आदेश काढले आहे. ग्रामरोजगार सेवक, डाटा आॅपरेटर, तांत्रिक अधिकारी, वीज वितरण विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचारी यासह अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळत नाही. कामगार कायद्याचे उल्लंघन होत आहे आदी आरोप निवेदनातून करण्यात आले.
यासह शेतकरी व शेतमजुरांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळत नाही. गोवा व केरळ राज्यांत शेतकरी व शेतमजुरांना पेंशन दिली जाते. राज्यातील शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेंशन दिली जावी, अशी मागणी करण्यात आली.
मोलकरणी व इमारत बांधकाम कामगारांच्या हितासाठीच्या फसव्या जाहिराती केल्या जात असल्याचा आरोप करुन मोर्चात निदर्शने देण्यात आली. यावेळी आयटकच्या हसीना गोरडे, विजया पावडे, मैना उईके, वंदना काळसकर, सुजाता शंभरकर, रेखा काचोळे, रेखा कोठेकर, प्रा. राजू गोरडे व अन्य पदाधिकाऱ्यांचा मोर्चात सहभाग होता. या निवेदनाची दखल घेत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)