संस्कार अॅग्रोच्या व्यवस्थापनाविरोधात आंदोलन
By Admin | Updated: January 5, 2016 02:27 IST2016-01-05T02:27:11+5:302016-01-05T02:27:11+5:30
संस्कार अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड वायगाव (नि.) येथील कामगारांना वेळेवर वेतन व कंपनीत कायम करण्याची मागणी घेत भीम

संस्कार अॅग्रोच्या व्यवस्थापनाविरोधात आंदोलन
वर्धा : संस्कार अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड वायगाव (नि.) येथील कामगारांना वेळेवर वेतन व कंपनीत कायम करण्याची मागणी घेत भीम टायगर सेनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी सेनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये पाच वर्षे काम करणाऱ्या कामगारांना कायम करण्याचे लिखित आॅर्डर देण्यात यावे, वायगाव ते खरांगणा बस पूर्ववत चालू करण्यात यावी, पॅकिंग विभागातील कामगार ज्या विभागात होते त्यांना त्याच विभागात काम देण्यात यावे, ज्या कामगारांना बोनस मिळाले नाही त्यांना त्वरित बोनस देण्यात यावे यासह तिसऱ्या शिफ्टसाठी महिलांना सक्ती करू नये, कोणत्याही कामगाराला ओ.टी. साठी बळजबरी करू नये, जे व्यक्ती दोन महिन्यांपासून व्यवस्थापनाच्या संपर्कात असून सुद्धा त्यांना कामावर घेतल्या जात नाही. आदी मागण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी भीम टायगर सेनेचे जिल्हा प्रमुख अतुल दिवे, शहर प्रमुख विशाल रामटेके, तालुका प्रमुख नितीन कुंभारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)
कंपनीत कामगार कायद्यान्वये घोषित सर्व नियम पाळले जात आहेत. वायगाव ते खरांगणा या मार्गावर अत्यल्प कामगार असल्याने ती बस बंद केली आहे. तसेच महिलांना रात्रपाळी सुरू केली असली तरी त्यांना ती बंधनकारक नाही.
- डॉ. कैलास सिंघानिया, संचालक, संस्कार अॅग्रो प्रा.लि. वायगाव (नि.)