मदर टेरेसांनी कुठलेही चमत्कार केले नाही
By Admin | Updated: January 9, 2016 02:36 IST2016-01-09T02:36:41+5:302016-01-09T02:36:41+5:30
चमत्कार कधीही कुणीही करू शकत नाही याचा पुरावा राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून मांडला आहे.

मदर टेरेसांनी कुठलेही चमत्कार केले नाही
पंकज वंजारे : चमत्कार चिकटवून त्यांच्या समाजसेवेचा अपमान
वर्धा : चमत्कार कधीही कुणीही करू शकत नाही याचा पुरावा राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून मांडला आहे. मदर टेरेसा यांनी केलेली समाजसेवा ही जगद्गुरू तुकारामांच्या व्याख्येप्रमाणे संत म्हणून सिद्ध होते. त्यांनी चमत्कार केला म्हणून त्यांना चर्च संतपद देत असेल तर हा संतपदाचा, संताचा अपमान आहे. मदर टेरेसांनी कुठलेही चमत्कार केले नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हासंघटक पंकज वंजारे यांनी केले.
समुद्रपूर तालुक्यातील वासी येथील श्री संत हरिबाबा गुरूदेव सेवा मंडळच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवातील जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सहसंघटक आकाश जयस्वाल, जिल्हा सचिव निलेश गुल्हाने, पंचायत समितीचे सदस्य धनपाल भगत, हिंगणघाट तालुका अध्यक्ष मनोज गायधने, समुद्रपूर तालुकाध्यक्ष उमेश पोटे, तालुका संघटक प्रफुल कुडे, उल्हास बाभूळकर, राहुल वंजारे, आशिष पडोळे उपस्थित होते.
वंजारे म्हणाले, मदर टेरेसा यांनी कुठलेही चमत्कार केलेले नाही. ज्या रोग्यांना दुरूस्त करण्याचा दावा चमत्काराच्या माध्यमातून होत आहे ते अर्धसत्य असून वैद्यकीय उपचारातून रूग्ण बरे झाल्याचा दावा पंकज वंजारे यांनी केला. जाहीर सभेत कथित चमत्कार सिद्ध करण्याचे आवाहनही त्यांनी चर्चच्या पोपला दिले.
जिल्हा सचिव निलेश गुल्हाने यांनी जादूटोणा विरोधी कायद्याची पार्श्वभूमी विशद करीत कायद्यातील महत्वाची कलमे, कायद्यानुसार शिक्षेचे स्वरूप, दक्षता अधिकाऱ्यांची व नागरिकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यासंदर्भात उपयुक्त माहिती दिली. अ. भा. अंनिसची ‘आमचा देवाधर्माला विरोध नाही’ ही भूमिका व चळवळीची वाटचाल यासंदर्भात तालुकासंघटक प्रफुल कुडे यांनी माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा सहसंघटक आकाश जयस्वाल यांनी केले. संचालन सुधाकर राऊत यांनी केले तर आभार वासुदेव दारूणकर यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)