‘त्या’ सन्मानातून मातृशक्तीने दिली मायेची ऊब
By Admin | Updated: October 17, 2016 01:03 IST2016-10-17T01:03:02+5:302016-10-17T01:03:02+5:30
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणारा शिपाई प्राणाची आहुती देतो. वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या परिवाराचे दु:ख काय असते,

‘त्या’ सन्मानातून मातृशक्तीने दिली मायेची ऊब
मेघना वासनकर : शहिदांच्या वीर पत्नींचा सत्कार, गांधीनगरातील शारदा महिला मंडळाचा उपक्रम
पुलगाव : देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणारा शिपाई प्राणाची आहुती देतो. वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या परिवाराचे दु:ख काय असते, हे आपण समजू शकत नाही. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असणारा दारूगोळा भांडार शहरात आहे. काही महिन्यांपुर्वी या भांडारात अग्नीस्फोट झाला. त्यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी प्राणाची आहुती देत शहर व ग्रामस्थांचे जीव वाचविले; पण जे शहीद झाले, त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांचे दु:ख कुणाला कमी करता येत नाही; पण मातृशक्ती शारदा महिला मंडळाने अग्नीस्फोट व कारगील युद्धातील शहिदांच्या वीरपत्नीचा सन्मान करून मायेची ऊब दिली, असे मत न.प. मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी व्यक्त केले.
मातृशक्ती शारदा महिला मंडळाद्वारे गांधीनगर परिसरात शहिदांच्या वीरपत्नीचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मनीष साहू तर अतिथी म्हणून प्राचार्य प्रमिला नकाशे, नगर सेविका चंद्रकला डोईफोडे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष रंजना पवार, प्रभाकर शहाकार, कृउबा समितीचे राजाभाऊ खेडकर उपस्थित होते.
गायिका वर्षा बाभळे यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमात उरी येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद््नंतर स्थानिक अग्नीस्फोटात शहीद झालेल्या स्व. चोपडे, दांडेकर, मेश्राम, पाखरे, येसनकर व कारगील शहीद स्व. कृष्णाजी समरीत व स्व. सोहनसिंह पवार यांच्या वीर पत्नीचा साडी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नगराध्यक्ष साहु यांनी शहरातील गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात; पण मातृशक्ती महिला मंडळाने मागील वर्षी ज्येष्ठ मातृशक्तीचा सत्कार केला. यावर्षी शहिदांच्या वीर पत्नीचा सत्कार करून सामाजिक ऋण फेडले. नागरिकांच्या सहकार्यानेच नगर परिषदेला स्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय हागणदारी मुक्त शहर पुरस्कार प्राप्त झाला. पुढेही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
गांधी नगरातील खेडकर कुटुंबीयांनी स्व. कोकीळाबाई खेडकर यांच्या स्मृत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रास्ताविकातून माजी प्राचार्य मीना देशपांडे यांनी शहिदांच्या कर्तबगारीवर प्रकाश टाकत मंडळाच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन संगीता शहाकार यांनी केले तर उपस्थितांचे आभार रेणुका खेडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा श्रीराव, कार्याध्यक्ष संगीता देशमुख, खेडकर कुटुंबीय आदींनी सहकार्य केले. बाभळे यांनी गायलेल्या वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)