२० फूट पाण्यावर माँ दुर्गेची स्थापना
By Admin | Updated: October 7, 2016 02:19 IST2016-10-07T02:19:41+5:302016-10-07T02:19:41+5:30
स्व्थानिक विठ्ठल रुख्माई मंदिराच्या पायथ्याशी निसर्गरम्य जागेत गावाशेजारी १४ एकर तलाव पाण्याने भरला आहे.

२० फूट पाण्यावर माँ दुर्गेची स्थापना
तलावामध्ये विद्युत रोषणाई : भाविकांचे ठरतेय आकर्षण
तळेगाव (टा.) : स्व्थानिक विठ्ठल रुख्माई मंदिराच्या पायथ्याशी निसर्गरम्य जागेत गावाशेजारी १४ एकर तलाव पाण्याने भरला आहे. यावर्षी २०० फुट लांब अंतरावर २० फूट खोल पाण्यावर माँ दुर्गेची स्थापना करण्यात आली आहे. तलावात साजरा होणारा हा दुर्गोत्सव भाविकांसाठी आकर्षण ठरला आहे.
मागील दोन वर्षे तलावात पाणी कमी असल्याने नवयुवक मंडळाने तलावाच्या काठावर माँ दुर्गेची स्थापना केली होती. यामुळे भाविकांचा हिरमोड झाला होता. वानरदेव चौकातील नवयुवक दुर्गा मंडळाने भाविकांचा हिरमोड होऊ नये व गावात नवरात्र उत्सवात साजरे व्हावे म्हणून यंदा तलावातच सजावट केली आहे. हे मंडळाचे १३ वे वर्षे आहे. यात पाच वर्षे मंडळाने लाकडी मयाल बांधून पूल तयार केला होता. यानंतर मंडळातील काही होतकरू तरूणांनी स्वत:ची बुद्धी वापरून देवीचे लोखंडी मंदिर उभारले. सभोवताल प्लायवुड लावले आणि मंदिराच्या खाली प्लास्टिक ड्रमचा वापर केला आहे. माँ दुर्गेचे मंदिर सकाळी व सायंकाळी या दोन वेळेत आरतीसाठी तलावाच्या काठावर आणले जाते. आरती झाल्यानंतर मंदिर देवीच्या जागेवर नेले जाते. मंडळाने भाविकांचा उत्साह वाढविण्यासाठी तलावाच्या सभोवताल व तलावात विद्युत रोषणाई केली आहे. यात नवयुवक मॉ दुर्गा मंडळ वानरदेव चौक, ओम, त्रिशुल आदी नावे विद्युत रोषणाईने पाण्यावरती तलावात लावली आहेत. सोबतच कारंजे तसेच मोठ्या प्रमाणात दिवे लावलेत. यामुळे रात्री गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. दर्शनासाठी मंडळाने प्लास्टिक ड्रमचा वापर करून बोट तयार केली आहे. यामुळे भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करीत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे.(वार्ताहर)