वजनकाट्यात सर्रास दांडी
By Admin | Updated: March 6, 2015 01:52 IST2015-03-06T01:52:56+5:302015-03-06T01:52:56+5:30
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत वजन महत्त्वाचे आहे. याच वजनाचा आधार घेत वस्तूची किंमत ठरते. मात्र जिल्ह्यात याच वजनाच्या माध्यमातून काही अपवाद वगळता...

वजनकाट्यात सर्रास दांडी
वर्धा : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत वजन महत्त्वाचे आहे. याच वजनाचा आधार घेत वस्तूची किंमत ठरते. मात्र जिल्ह्यात याच वजनाच्या माध्यमातून काही अपवाद वगळता ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील वजनकाट्यांची सहा महिन्यांपासून तपासणीच झाली नसल्याची खळबळजनक माहिती गुरुवारी पुढे आली. जिल्ह्यात अप्रमाणित वजनकाट्यांच्या माध्यमातून व्यवहार सुरू असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.
प्रत्येक दुकानातील वजनकाट्याची वर्षाकाठी तपासणी करणे गरजेचे आहे. अन्यथा दुकानदारांना दंड बसतो. वजनकाट्यांच्या दुरुस्तीसाठी रिपेअर, बनविण्यासाठी डिस्ट्रीब्युटर आणि विक्रीसाठी डिलरचे परवाने वजनमापे विभाग देतात. दरवर्षी या परवान्याचे नुतनीकरण करावे लागते. यावर्षी मात्र नुतनीकरणाच्या प्रक्रियेत जाचक अटींचा समावेश केल्याने परवान्यांचे नुतनीकरण करणे परवानाधारकांसाठी कठीण झाले आहे. यामुळे शासनाच्या मोजक्या कर्मचाऱ्यांकडून वजनाची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी आजच्या घडीला अनेक दुकानातील काटे अप्रमाणित असल्याची माहिती आहे.
यावर्षी परवान्याच्या नुतनीकरणासाठी विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाला नुकताच जाहीर झाला. यात सारेच नापास झाल्याचे जाहीर करण्यात आले. परीक्षा घेताना ज्या कामाचा परवाना देण्यात येतो त्याच विषयाचे प्रश्न विचारणे अपेक्षित होते; मात्र येथे दुरूस्ती करणाऱ्यांना निर्मात्याचे व डिस्ट्रब्युटरशी संबंधित असलेले प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. वजनमापे प्रमाणित नसल्याने ग्राहकांनी घेतलेली वस्तू त्यांना आवश्यक असलेल्या वजनाची आहे अथवा नाही हे सांगणे कठीण झाले आहे. परवानाधारक दुकानातील वजनकाट्याची तपासणी करून दुरूस्ती अहवाल जिल्ह्याच्या वजनकाटे तपासणी विभागाला देतात. त्यानुसार दुकानदाराला प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यात असलेल्या दुकानातील काटे तपासल्याच गेली नाहीत. परिणामी ग्राहकांना नुकसान सहन करावे लागत आहे.(प्रतिनिधी)
नव्याने आलेल्या अटींमुळे रखडले परवान्यांचे नुतनीकरण
वजनमापे रिपेअर, मॅन्युफॅक्चरर आणि डिलर याकरिता दिल्या जाणारा परवाना मिळविण्याकरिता पहिल्यांदाच परीक्षा होत आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रमच अस्तित्त्वात नसल्याने अभ्यास नेमका कसला करावा या गोंधळात परीक्षार्थी आहेत.
नवीन परवान्याकरिता इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर ही पात्रता ठेवण्यात आली आहे.
परवानाधारकाचे वर्कशॉप २० चौरस फुटात असावे, त्याच्या व्यवसायाचे दर वर्षाला आॅडीट झाले असावे, त्याच्याजवळ क्रिमिलिअर सर्टीफिकेट असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात रिपेअर, मॅन्युफॅक्चरर व डिलर म्हणून ३५ लोक
जिल्ह्यात असलेल्या दुकानातील वजनांची तपासणी करणे, दुरूस्ती करणे व कुणाला नवे वजन विक्रीकरिता एकूण ३५ जण काम करीत आहेत. काहिंचा वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे. शासनाने नव्याने लादलेल्या अटींमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाचा महसूल बुडतोय
दुकानात जाऊन वजनकाट्यांची दुरुस्ती करून वजन निरीक्षकांकडून प्रमाणपत्र मिळवून देण्याचे काम वजनमापे दुरुस्तीकर करीत होते. त्या माध्यमातून दुकानदाराला घरबसल्यास वजनकाट्याचे प्रमाणपत्र मिळत होते. यातून शासनाला विना श्रमाने गोळा होत होता. मात्र यांचे परवाने रद्द केल्याने स्वत: वजनमापे निरीक्षकाला आस्थापनेवर जावून तपासणी करावी लागत आहे. यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.
६० हजार दुकानांकरिता तीनच कर्मचारी
जिल्ह्यात असलेल्या सुमारे ६० हजार दुकान आणि उद्योगातील वजनकाटे तपासणीकरिता केवळ तीनच कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष दुकानात जावून वजनकाट्यांची तपासणी करणे कठीण काम आहे. यामुळे बऱ्याच दुकानातील काटे प्रमाणित नाही. शिवाय शासनालाही महसूल मिळत नाही. या अप्रमाणित काट्यांमुळे ग्राहकांना फटका सहन करावा लागत आहे.