मुदत संपलेल्या पदार्थांची दुकानांतून सर्रास विक्री
By Admin | Updated: May 3, 2017 00:40 IST2017-05-03T00:40:47+5:302017-05-03T00:40:47+5:30
पॅकबंद असलेल्या पदार्थांच्या पाकिटांवर कंपन्यांकडून ‘मॅन्यूफॅक्चर आणि एक्स्पायरी डेट’ लिहिलेली असते.

मुदत संपलेल्या पदार्थांची दुकानांतून सर्रास विक्री
पुलगाव येथील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वर्धा : पॅकबंद असलेल्या पदार्थांच्या पाकिटांवर कंपन्यांकडून ‘मॅन्यूफॅक्चर आणि एक्स्पायरी डेट’ लिहिलेली असते. कंपन्यांकडून दिलेल्या मुदतीत या पदार्थांची विक्री करणे बंधनकारक असते; पण पुलगाव शहरातील इंदिरा मार्केट परिसरात असलेल्या एका किराणा दुकानातून मुदत संपलेल्या बहुतांश पदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुलगाव येथील इंदिरा मार्केट येथे समोर असलेल्या किराणा दुकानातून शुक्रवारी एका ग्राहकाने चिमुकल्या मुलांचे पोषक खाद्य असलेले नाचणीचे पॅकेट खरेदी केले. हे पॅकेट संबंधित कंपनीमार्फत ६ जुलै २०१६ रोजी पॅकबंद करण्यात आले तर मुदत ५ नोव्हेंबर २०१६ देण्यात आली होती. यामुळे मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंतच सदर पॅकेटची विक्री करणे अनिवार्य होते. यानंतर सदर दुकानदाराला तो माल कंपनीला परत पाठविता आला असता; पण असे न करता नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत सदर दुकानदाराकडून २०१७ मध्येही तो माल विकला जात असल्याचे शुक्रवारी दिसून आले.
या किराणा दुकानातून अन्य पॅकबंद पदार्थांचीही मुदत संपल्यानंतर सर्रास विक्री होत असल्याची ओरड ग्राहकांकडून करण्यात येत आहे. याच प्रकारामुळे अनेकदा वादही झाले; पण किराणा व्यावसायिक त्यांना दाद देत नसल्याचेच दिसून आले. अनेक ग्राहक माल घेतल्यानंतर वाद घालून अखेर तो परत करतात. या दुकानदाराबाबत अनेक तक्रारी असल्याचेही ग्राहक सांगतात. असे असले तरी अद्याप त्यांच्यावर अन्न व औषधी प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात आले नसल्याचेच दिसून येते. अन्न व औषधी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)