अधिक महिन्यात ‘अधिक’चा कचरा

By Admin | Updated: July 4, 2015 00:32 IST2015-07-04T00:32:29+5:302015-07-04T00:32:29+5:30

अधिक महिन्यात नदीवरील स्नान महत्त्वाचे मानले जाते.

More 'waste' garbage in the month | अधिक महिन्यात ‘अधिक’चा कचरा

अधिक महिन्यात ‘अधिक’चा कचरा

धाम पात्राला अवकळा : दिवे सोडण्यासाठी प्लास्टिक द्रोणच्या वापराने सर्वत्र प्रदूषण
पराग मगर वर्धा
वर्धा : अधिक महिन्यात नदीवरील स्नान महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सध्या जिल्हावासीयांचे जत्त्थे पवनार येथील धाम नदीवर स्नानासाठी जाताना दिसत आहे. परंतु केवळ स्नानच न करता येथे करण्यात येत असलेल्या विधीमुळे आणि त्यात वाढता प्लास्टिकचा वापर यामुळे नदीपात्राला अवकळा आली आहे. त्यामुळे अधिक महिन्यात येथे अधिकचा कचरा साचत आहे. विशेष म्हणजे यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक द्रोणचा खच साचत आहे.
अधिक महिना सुरू होऊन पंधरवाडा लोटला आहे. दर तीन वर्षांनी अधिकमास येत असतो. या महिन्यात जिल्ह्यात सर्वत्र नद्यांवर स्नानासाठी विशेष करून महिलांची गर्दी असते. अन्य वेळी नदीवर स्नानासाठी जाण्यासाठी वेळ व कारण मिळत नसल्याने बदल आणि हौस म्हणूनही माहिला अधिक मासात स्नानाला जातात. पवनार येथील धाम नदीला प्राचीन महत्व आहे. आसपास असलेल्या मंदिरे, निसर्गरम्य परिसर आणि खडकांनी आच्छादलेले पात्र यामुळे हे स्थान सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. केवळ स्नानापर्यंत ही बाब थांबली असती तर कुठलीही अडचण नव्हती. परंतु यावेळी करण्यात येत असलेल्या पूजेमुळे नदीपात्र आणि परिसरात प्रचंड घाण पसरत आहे. पूजा झाल्यावर महिला दिवा नदीत सोडत असतात. पूर्वी पळसाच्या पाणात, नारळाच्या करवटीत किंवा मातीच्या दिवनालीत हा दिवा सोडला जात असे. परंतु या काही वर्षातही जागा प्लास्टिक द्रोणांनी घेतली आहे. हे द्रोण सहज उपलब्ध होतात. त्यामुळे अशा द्रोणांमध्ये दिवे सोडले जात आहेत. या प्रकारामुळे सध्या धाम नदीपात्रात प्लास्टिक द्रोणांचा खच साचला आहे. पुजेच्या नावाखाली येथे मोठ्या प्रमाणात तांदळाची नासाडीही होत आहे. खडकांवर असलेल्या पिंडीवर तांदूळ, सुपारी व इतरही साहित्याचा खच दिसत आहे. तसेच हे सर्व साहित्य प्लास्टिक पन्नीत आणल्या जाते. या कारणाने प्लास्टिक कचरा ही मोठी समस्या येथे निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देत येथे कचरा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. परंतु येथे इतक्या वर्षात साधी कचराकुंडी बसविण्याचे सौजन्यही पवनार ग्रामपंचायतने दाखविलेले नाही.(शहर प्रतिनिधी)

Web Title: More 'waste' garbage in the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.