दीड टक्का वाढीव हमीभाव शेतकऱ्यांची थट्टाच
By Admin | Updated: June 15, 2016 02:34 IST2016-06-15T02:34:20+5:302016-06-15T02:34:20+5:30
भाजपाचे सरकार आल्यास उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा वाढवून शेतमालाचा हमीभाव जाहीर करणार असे आश्वासन

दीड टक्का वाढीव हमीभाव शेतकऱ्यांची थट्टाच
शासनाचा जाहीर निषेध : किसान अधिकार अभियानचे धरणे
वर्धा : भाजपाचे सरकार आल्यास उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा वाढवून शेतमालाचा हमीभाव जाहीर करणार असे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात केवळ दीड टक्का हमीभाव वाढवून शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप करीत याच्या निषेधार्थ किसान अधिकार अभियानच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
भाजपाचे सरकार आल्यावर उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक नफ्याने शेतीमालाचा हमीभाव जाहीर करू, शेतकऱ्यांसाठी २००६ ला शासनासमोर प्रस्तुत केलेला राष्ट्रीय शेतकरी आयोग (डॉ. स्वामीनाथन आयोग) लागू करू, देशातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून ७/१२ कोरा करू, बियाणे, फवारणी औषधी, रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल यांचे भाव नियंत्रणात ठेवून, विदेशातील काळा पैसा १०० दिवसात भारतात आणून मतदार नागरिकांच्या बँक पासबुकात किमान १५ ते २० लाख रुपये जमा करू, सर्व स्तरावरील शासन प्रशासनातील भ्रष्टाचाराला संपूर्ण आळा घालू अशा प्रकारची बारीच आश्वासने भाजपा पक्षाने दिली होती. ती आश्वासने आता फोल ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनानंतर शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन सादर केले.