दीड महिन्यांनी आली महावितरणाला जाग

By Admin | Updated: May 22, 2016 01:51 IST2016-05-22T01:51:34+5:302016-05-22T01:51:34+5:30

तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब शेतात आडवे झाले होते.

A month and a half came to Mahavitaran awake | दीड महिन्यांनी आली महावितरणाला जाग

दीड महिन्यांनी आली महावितरणाला जाग

लोकमत वृत्ताची दखल : शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
देवळी : तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब शेतात आडवे झाले होते. परिणामी, लोंबकळत्या तारांमुळे धोका निर्माण झाला होता. याबाबत तक्रार देऊनही महावितरणला जाग आली नाही. याबाबत वृत्त प्रकाशित करताच मात्र महावितरण प्रशासन खडबडून जागे झाले. दीड महिन्यानंतर गुरुवारपासून कामाला सुरुवात करण्यात आली.
सोनेगाव (बाई) गावाला दररोज महावितरणच्या हलगर्जीचा फटका बसत आहे. गत कित्येक वर्षापासून नागरिक त्रास सहन करीत आहेत. गावातील विजेच्या लपंडावाचा सामना करीत असतानाच शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू झाला होता. गावालगतचे वीज खांब वाकल्याने त्याच्या तारा लोंबकळत होत्या. इतकेच नव्हे तर खापर्डे नामक शेतकऱ्याच्या शेतातील एक खांब वाकल्याने तारा डोक्याला लागत होत्या. दरम्यान, वादळ झाल्याने तारांचे घर्षण होऊन शेतालगतचा भाग जळाला होता. यामुळे शेतकऱ्याने वीज कंपनीकडे तक्रार देत उपाययोजना करण्याची मागणी केली होती; पण तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती. महिना-दीड महिना लोटूनही या तक्रारीकडे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीची कामे खोळंबली होती.
शेतकऱ्यांनी अभियंत्यांशी संपर्क साधला तर त्यांना उर्मट उत्तरे दिली जात होती. परिणामी, वाकलेले खांब शेतात आडवे झाल्याने शेतकऱ्यांनीच वीज पुरवठा खंडित केला. वीज पुरवठ्याअभावी परिसरातील पिके वाळली. जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या मशागतीचे कामेही खोळंबली. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून वृत्त प्रकाशित करण्यात आले. वृत्त उमटताच दीड महिन्याने महावितरणला जाग आली. अधिकाऱ्यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
शुक्रवारी सकाळपासून सोनगाव बाई व परिसरातील वाकलेले आणि पडलेले खांबे उभे करणे तसेच नवीन खांब बसविणे, तुटलेल्या तारा जोडण्याचे काम हाती घेण्यात आले. दीड महिन्यांपासून रखडलेली मशागतीची कामे आता होऊ शकणार असल्याने शेतकऱ्यांनाा मोठा दिलासा मिळाला.(प्रतिनिधी)

आता सर्वच काम ओके करून जातो
एरवी शेतकरी व नागरिकांना टाळणारे महावितरणचे कर्मचारी वृत्त प्रकाशित होताच गावातच नव्हे तर शेताच्या बांधावर पोहोचले. सर्व परिस्थितीची माहिती घेऊन शेतकऱ्यांसमोरच कामाला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर आणखी काय समस्या आहे, आताच सांगा, सर्व कामे ओके करुनच गावातून जातो, असेही कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना आश्वस्त केले; पण शेतातील खांबांच्या समस्येसोबतच गावातील विजेची समस्या ते सोडवतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावातील विजेच्या लपंडावाची समस्या निकाली काढली तर महावितरणचे नक्कीच आभार मानू, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Web Title: A month and a half came to Mahavitaran awake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.