पावसाळा संपला; रस्त्यावर खड्डे

By Admin | Updated: November 1, 2014 23:12 IST2014-11-01T23:12:40+5:302014-11-01T23:12:40+5:30

यंदा पावसाळा संपून महिना उलटला. रस्त्यांवरील खड्डे वाढल्याने अपघात वाढले आहेत; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही डागडुजी सुरू केली नाही. याप्रकरणी नागरिकांनी

The monsoon is over; Potholes on the road | पावसाळा संपला; रस्त्यावर खड्डे

पावसाळा संपला; रस्त्यावर खड्डे

आष्टी (श़) : यंदा पावसाळा संपून महिना उलटला. रस्त्यांवरील खड्डे वाढल्याने अपघात वाढले आहेत; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही डागडुजी सुरू केली नाही. याप्रकरणी नागरिकांनी नवनिर्वाचित आमदार अमर काळे यांना निवेदन सादर करीत खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.
तळेगाव-आष्टी-साहूर या राज्यमार्ग क्ऱ २४४ वर मोठे खड्डे पडले आहे. प्रवाशांना वाहन चालविताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. दुचाकी चालकांना मोठ्या वाहनांचा सामना करावा लागत आहे. खडकी-खंबीत-बेलोरा, नांदपूर-चिस्तूर-खडकी, आष्टी -थार-पार्डी, साहूर-माणिकवाडा, आष्टी-परसोडा रस्त्यांवर जागोजागी खड्डेच आहेत़ पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली़ दरवर्षी पावसाळ्यात खडी व मुरूमाने खड्डे बुजविले जात होते; पण यंदा निधी नसल्याचे सांगत बांधकाम विभागाने वेळकाढू भूमिका घेतली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर खराब होत आहे. अनेक वाहनांना पंक्चरचाही फटका बसतो. अशावेळी गाडी दुरूस्त करण्यास वेळ खर्च करावा लागत आहे. खड्ड्यातून वाहन चालविताना ज्येष्ठ नागरिकांना पाठीचे, कमरेचे, मणक्याचे आजार वाढले आहेत़ तळेगावपासून ममदापूर गावापर्यंत खोल खड्डे पडले आहेत़ आष्टी गणेशपूर वॉर्डातही खड्डेच अधिक आहेत़ आष्टी-साहूर मार्गावर खड्डे वाढले आहेत़ धाडी ते साहूरपर्यंत खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकांचे नियंत्रण सुटते़ त्याची किंमत अपघातात चुकवावी लागते. परिवहन महामंडळाच्या भंगार बसेस खड्ड्यांमुळे पंक्चर होतात.
दोन दिवसांपूर्वी धाडी घाटामध्ये एक बस पंक्चर झाल्याने प्रवासी सुमारे दोन तास ताटकळत होते. रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. आष्टी-परसोडा रस्त्याची स्थितीही गंभीर आहे. काळ्या मातीमुळे रस्ता दबला आहे. दोन किमी रस्त्यावरचे डांबर पूर्णत: निघाले आहे. आष्टी-थार-पार्डी रस्त्यावर घाटवळण आहे. चढावर खड्डे असल्याने वाहन चालविताना चांगलीच कसरत करावी लागते़ या मार्गावरून दही, ताक, दूध, तूप आदी पदार्थांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते; पण खड्ड्यांमुळे अनेकदा सायकलस्वार आदळतात़ खड्ड्यांची अवस्था पाहून प्रत्येक प्रवासी वाहन कसे चालवायचे या प्रश्नावर निरूत्तर होतो़ सार्वजनिक बांधकाम विभागास वारंवार निवेदने सादर केलीत; पण दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेवटी नागरिकांनी आ़ अमर काळे यांना निवेदन सादर केले असून बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
गत अनेक दिवसांपासून रस्त्यांच्या कामांचा दर्जा घसरल्याने खड्ड्यांची डागडुजी झाली, असे वाटत नाही. बांधकाम विभाग तुटपुंजी निविदा काढून मोकळे होतात. कमी पैशात अधिक खड्डे बुजविण्याचे धोरण ठेवत असल्याने कामाची दर्जात्मक बांधणी करणेही कठिण झाल्याचे दिसते़ या सर्व बाबी विचारात घेऊन चांगल्या पद्धतीची कामे व्हावीत, अशी मागणीही नागरिकांनी आ. काळे यांना निवेदनातून केली आहे़(प्रतिनिधी)

Web Title: The monsoon is over; Potholes on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.