मोका पाहणी झाली; पण शेतकऱ्याला मदतच नाही
By Admin | Updated: December 20, 2014 22:45 IST2014-12-20T22:45:04+5:302014-12-20T22:45:04+5:30
दीड वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील एका शेतकऱ्याची कपाशीची लागवड केलेले संपूर्ण शेत खरडून गेले़ या शेताची प्रत्यक्ष मोक्का पाहणी कृषी सेवकाने केली; पण नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव मदत

मोका पाहणी झाली; पण शेतकऱ्याला मदतच नाही
केळझर : दीड वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील एका शेतकऱ्याची कपाशीची लागवड केलेले संपूर्ण शेत खरडून गेले़ या शेताची प्रत्यक्ष मोक्का पाहणी कृषी सेवकाने केली; पण नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव मदत यादीत आलेच नाही़ यामुळे शेतकऱ्याला मानसिक धक्का बसला़ कृषी सेवकाच्या सदोष कार्यप्रणालीमुळे पिडीत शेतकऱ्यावर शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली.
१९ जुलै २०१३ रोजी संपूर्र्ण सेलू तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले होते. यात अनेक शेतकऱ्यांची शेती पुरामुळे खरडून गेली. यात येथील शेतकरी रमेश कोपरकर यांचीही कपाशीची शेती नाल्याच्या पुरामुळे खरडून निघाली होती. यात या शेतकऱ्याचे दोन एकरापेक्षा अधिक शेती खरडून निघाली. अतिवृष्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येथील पदभार असलेले कृषी सेवक प्रत्यक्ष मोक्का पाहणीसाठी आले़ तलाठ्याकडूनही पंचनामा करण्यात आला़ यामुळे कोपरकर यांना शासकीय मदत मिळेल, अशी अपेक्षा होती; पण शासकीय मदतप्राप्त शेतकऱ्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा उल्लेखच नव्हता़ यामुळे शेतकऱ्याला धक्काच बसला़ याबाबत कृषी सेवक रिंधे यांना विचारणा केली असता त्यांनी कोपरकर यांचे नाव अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत नोंदविले नसल्याचे मान्य केले़ दोन महिन्यांपूर्वी पुन्हा कोपरकर यांना शासकीय मदत मिळावी म्हणून नाव देण्यात आले; पण यास विलंब झाल्याने त्यांना नुकसान भरपाई नामंजुर करण्यात आली. कृषी सेवकांच्या गलथान कारभारामुळे रमेश कोपरकर अतिवृष्टी पिडीत असताना शासकीय मदतीपासून वंचित राहिलेत़ सदर शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे़(वार्ताहर)