आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षकांनी प्रभावी वापर करावा
By Admin | Updated: February 3, 2015 23:00 IST2015-02-03T23:00:58+5:302015-02-03T23:00:58+5:30
बदलत्या काळानुरूप परंपरागत अध्यापन पद्धतीतही बदलाची गरज आहे. शिक्षकांनीही काळाची गरज लक्षात घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा आणि शैक्षणिक गुणवत्ता

आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षकांनी प्रभावी वापर करावा
वर्धा : बदलत्या काळानुरूप परंपरागत अध्यापन पद्धतीतही बदलाची गरज आहे. शिक्षकांनीही काळाची गरज लक्षात घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा आणि शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी अधिक परिश्रम घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळू बोरसे-पाटील यांनी केले.
येथील मातोश्री सभागृहात रविवारी आयोजित शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती मिलिंद भेंडे, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, शिक्षक समितीचे राज्यसरचिटणीस उदय शिंदे (सातारा), राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे, नागपूर विभाग प्रमुख नरेश गेडे आदी उपस्थित होते.
बोरसे म्हणाले, राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यामध्ये आंतरजिल्हा बदली, प्रत्येक तुकडीला स्वतंत्र शिक्षक, संगणक अर्हता प्राप्त करण्यास मुदतवाढ, जिल्हा परिषदेच्या शाळांना पाचवी आणि आठवीची तुकडी जोडणे, प्रथम सारख्या पक्षपाती संस्थेकडून होणारे सर्वेक्षण बंद करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वीज आणि पाणीपुरवठा मोफत होणे, शैक्षणिक गुणवत्तावाढीचे उपक्रम शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीस राबविणे, सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करणे अशा प्रलंबित प्रश्नांच्या निरसनासाठी शासनासोबत चर्चा सुरू आहे. मात्र चर्चेतून प्रश्न न सुटल्यास शिक्षक समिती आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असे ही बोरसे यांनी स्पष्ट केले. अधिवेशनात जिल्ह्यातील सतरा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी सतीश आत्राम, अशोक कोडापे, पेंदामकर, शिक्षक समितीचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे, यवतमाळचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, नागपूरचे सरचिटणीस अनिल नासरे आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गाडेकर यांनी केले. संचालन अजय मोरे यांनी केले. महेंद्र भुते यांनी आभार मानले.(शहर प्रतिनिधी)