गणपती विसर्जनाकरिता गेलेला युवक बेपत्ता; शोध सुरूच
By Admin | Updated: September 9, 2014 23:54 IST2014-09-09T23:54:21+5:302014-09-09T23:54:21+5:30
नालवाडी परिसरातील बाल गणेश मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनाकरिता यमुना लॉन समोरील विहिरीजवळ गेलेला युवक बेपत्ता झाला. विहिरीत पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांसह पोलिसांनी विहिरीत

गणपती विसर्जनाकरिता गेलेला युवक बेपत्ता; शोध सुरूच
वर्धा: नालवाडी परिसरातील बाल गणेश मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनाकरिता यमुना लॉन समोरील विहिरीजवळ गेलेला युवक बेपत्ता झाला. विहिरीत पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांसह पोलिसांनी विहिरीत दोन दिवस शोधमोहीम राबविली; मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. बेपत्ता असलेल्या या युवकाचे नाव दीपक करनाके (३०) रा. नालवाडी असे आहे.
या प्रकरणाणबाबत थोक्यात वृत्त असे की, दीपक सोमवारी परिसरातील बाल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह विसर्जनाकरिता गेला होता. गणपती विसर्जन झाल्यावर तोही बेपत्ता असल्याचे लक्षात आले. यावरून तो विहिरीत पडल्याचा संशय बळावला. प्रकाराची माहिती शहर पोलिसांना दिली. सोमवारी दुपारपासून पोलीस व परिसरातील नागरिकांनी विविध प्रकारो विहिरीत त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. मंगळवारीही त्याचा शोध घेण्यात आला. यातही अपयश आले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या सांगण्यावरून शहर ठाण्याचे निरीक्षक एम. बुराडे यांनी घटनास्थळी येवून माहिती घेतल्याचे सांगितले. परंतु शहर ठाण्यात मात्र घटनेची नोंद नाही.
याबाबत अधिक विचारणा केली असता घटनास्थळ शहराच्या नाही तर सेवाग्राम पोलिसांच्या हद्दीत येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सेवाग्राम पोलिसांना विचारणा केल्यास घटनास्थळ शहर ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. सदर युवकाचा शोध घेण्याची मागणी आहे.(प्रतिनिधी)