बेपत्ता झालेली युवती २० तासांनी परतली
By Admin | Updated: November 4, 2014 22:44 IST2014-11-04T22:44:49+5:302014-11-04T22:44:49+5:30
तालुक्यातील एका विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या वेळेत दुपारी २ वाजताचे दरम्यान काही संशयितांनी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने देवळी पोलिसात केली. मात्र सदर मुलगी २० तासानंतर परत आली.

बेपत्ता झालेली युवती २० तासांनी परतली
युवतीच्या बयाणात तफावत : पोलिसांनी केली वैद्यकीय तपासणी
देवळी : तालुक्यातील एका विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या वेळेत दुपारी २ वाजताचे दरम्यान काही संशयितांनी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने देवळी पोलिसात केली. मात्र सदर मुलगी २० तासानंतर परत आली. शिवाय तिला पोलिसांसमोर हजर केले असता ती आपले बयान बदलत असल्यामुळे चांगलाच गोंधळ माजला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर विद्यार्थिनी बी.ए. भाग १ मध्ये शिकत असून सोमवारी दुपारी २ वाजता अचानक बेपत्ता झाली. मुलगी सायंकाळपर्यंत घरी परत न आल्यामुळे तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. यात चौकशीअंती काही युवकांनी तीला गाडीत कोंबून पळवून नेल्याचे उजेडात आले. यामुळे मुलीच्या आईच्या तक्रारीवरून संशयित म्हणून संगम खोडे रा. सिध्दार्थनगर, बोरगाव (मेघे) याच्यावर भांदवि ३६६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले; परंतु संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या संगम खोडे याचा यात काहीच दोष नसल्याचे समोर आल्याने त्याची सुटका करण्यात आली.
दरम्यान मंगळवारी सकाळी १० वाजता अपहरण झालेल्या मुलीचा तिच्या आई-वडिलांना वर्धा येथून फोन आला. यात सांगितलेल्या ठिकाणावरून तीला सोबत घेवून देवळी पोलिसात आणण्यात आले. तोंडाला कापड बांधलेल्या ५ ते ६ युवकांनी मला देवळी येथे गाडीत कोंबून सेवाग्रामकडे पळवून नेल्याचे सदर युवतीने पोलिसांना सांगितले.
सेवाग्राम उड्डाण पुलाच्या परिसरात सोमवारी मध्यरात्रीपर्यंत हे सर्व युवक माझे सोबत राहुन नंतर निघून गेले. त्यानंतर रात्रभर मी याच परिसरात फिरत होते. दरम्यान तिच्यावर कोणतीही जबरदस्ती झाली नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मुलीचे बयान विश्वासपात्र ठरत नसल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसून तो आल्यावरच यात काय आहे याचा खुलासा होईल असे पोलीस निरीक्षक वासेकर यांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास देवळी पोलीस करीत आहेत.(प्रतिनिधी)