‘त्या’ बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेहच आढळला
By Admin | Updated: October 21, 2015 02:16 IST2015-10-21T02:16:40+5:302015-10-21T02:16:40+5:30
येथील सिंदी (मेघे) परिसरात असलेल्या अजिंठा विद्यालयाचा विद्यार्थी वर्गशिक्षिकेला शौचास जातो असे सांगून गेला.

‘त्या’ बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेहच आढळला
विहिरीत पोहण्याकरिता गेल्याचा संशय
वर्धा : येथील सिंदी (मेघे) परिसरात असलेल्या अजिंठा विद्यालयाचा विद्यार्थी वर्गशिक्षिकेला शौचास जातो असे सांगून गेला. शाळा सुटण्याची वेळ झाली तरी तो आला नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला. तो आढळून आला नसल्याने अखेर शाळेच्यावतीने शहर ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना मंगळवारी शाळेच्या मागच्या परिसरात असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. गौरव रामाजी बोरले (१३) असे मृतकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शाळेत तासिका सुरू असताना गौरवने वर्गशिक्षिकेला शौचास जातो असे सांगून सुटी मागितली. यावेळी गौरव सोबत त्याचा मित्रही असल्याची माहिती आहे. शाळेच्या मागे असलेल्या विहिरीजवळ सदर दोघे जण गेले. शाळा सुटण्याची वेळ झाली तरीही गौरव न परतल्याने ही बाब शिक्षिकेने मुख्याध्यापकांना सांगितली. विद्यार्थ्याचा परिसरात शोध घेतला मात्र तो तेथे आढळला नाही. यानंतर मुख्याध्यापक किसना व्यापारी यांनी सोमवारी सायंकाळी शहर ठाण्यात विद्यार्थी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.
पोलिसांनी परिसरात विद्यार्थ्याचा शोध घेतला असता मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. यावेळी त्याचे कपडे, मोबाईल व चपला विहिरीजवळ दिसून आल्या. ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास शहर पोलीस करीत आहेत. या शाळेतील विद्यार्थी विहिरीत नेहमीच पोहण्याकरिता जात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. यातच ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. यावेळी गौरव सोबत गेलेल्या मित्राचे नाव सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला.(स्थानिक प्रतिनिधी)