अनेक कर्जाच्या फाईली गहाळ
By Admin | Updated: October 19, 2016 01:15 IST2016-10-19T01:15:28+5:302016-10-19T01:15:28+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचे सोंग शासनाच्यावतीने सुरू आहे.

अनेक कर्जाच्या फाईली गहाळ
किसान अधिकार अभियानचा आरोप : जिल्हा बँकेतील प्रकार
वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचे सोंग शासनाच्यावतीने सुरू आहे. या बँकेतून अनेक मोठ्या थकबाकीदारांची कागदपत्रे गहाळ आहे. कर्जासंदर्भातील पुरावे मिटविण्याकरिता या फाईल्स गहाळ करण्यात आल्या असून होत असलेली कारवाई केवळ औपचारिकता असल्याचा आरोप किसान अधिकार अभियानने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
सध्या जिल्हा बॅँकेवर प्राधिकृत समिती आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून त्यांच्या व्यस्त कारभारामुळे त्यांना बँकेवर लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोपही अभियानने केला आहे. जिल्हा उपनिबंधकांना जिल्ह्यातील नागरिक सहकारी बॅँका, पतसंस्था, कर्मचारी सहकारी पतसंस्था यांना हमी देऊन त्यांची खाती जिल्हा बॅँकेत वळती करण्यास वेळ नसून त्यांना केवळ सेवानिवृत्त गटसचिवांची ग्रॅच्युईटी व पगार याचीच काळजी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यामध्ये तालुका व जिल्हा देखरेख सहकारी संघ बंद करण्यात आलेले आहेत. राज्यातही असे संघ नाही; परंतु याला वर्धा अपवाद आहे. गटसचिव अनामत रक्कम दाखवून कर्जाच्या वसुलीमधून खर्च झाले म्हणून वसुल करून घेतात, कारण नसताना वर्धा जिल्हा देखरेख सहकारी संघात सेवानिवृत्त गटसचिवांना कामावर ठेवण्यात आले आल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आला आहे.