लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तळेगाव पोलिस स्टेशन हद्दीत ८ ऑक्टोबर २०२४ रोजी अल्पवयीन बालक मिळाला होता. बालकांच्या कुटुंबीयांचा जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिस विभागाने तब्बल ७ महिन्यांच्या प्रयत्नाने शोध घेऊन छत्तीसगड राज्यातील रायगढ जिल्ह्यात बालकास परत पाठविण्यास यश मिळाले.
तळेगाव श्या.पंत हद्दीत एक अल्पवयीन बालक सापडला होता. बालकास पोलिसांनी बाल कल्याण समितीपुढे हजर केले होते. बालकाला काळजी आणि संरक्षणाची गरज लक्षात घेता, बाल कल्याण समितीच्या आदेशाने श्रीछाया बालगृह येथे दाखल केले होते. त्याच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने वृत्तपत्रात प्रसिद्धी देऊन प्रयत्न करण्यात आले. मात्र, नातेवाइकाबाबत कुणीही संपर्क साधला नव्हता. याबाबत बाल कल्याण समितीने बालकाच्या पुनर्वसनाबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनेनंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी यांच्या समन्वयाने जिल्हा बाल संरक्षण कक्षांतर्गत समुपदेशक आरती नरांजे यांनी बालकाची माहिती घेतली असता, या बालकाकडून योग्य आणि खरी माहिती मिळालेली नाही. याबाबत संरक्षण अधिकारी वैशाली मिस्कीन यांनी पोलिस स्टेशनशी संपर्क केला असता, पोलिस विभागाने सदर बालकाचे कौटुंबिक नातेवाईक खरसिया रायगढ जिल्हा राज्य छत्तीसगढ येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
१०९८ क्रमांकावर संपर्क करामहिला व बाल विकास विभाग, पोलिस विभागाच्या यशस्वी प्रयत्नाने हरविलेल्या बालकाला ७महिन्यांत स्वजिल्ह्यात पाठविण्यात यश मिळाले. संपूर्ण कार्यवाही जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मनिषा करसंगे यांच्या मार्गदर्शनात झाली. जिल्ह्यात कुठेही हरविलेले बालक आढळल्यास त्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास देण्याचे आवाहन केले आहे.
बालकाला विश्वासात घेत मिळविली माहितीबालकाचे नवीन आधार कार्ड काढण्यात आले. श्रीछाया बालगृहातील अधीक्षक रूपली फाले यांनी बालकाशी संवाद साधत आणि बालकाला विश्वासात घेत मिळालेली माहिती ही खरी आहे काय याबाबत विचारणा केली. रायगड जिल्ह्यातील जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि खरसिया पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांशी संपर्क करुन बालकाच्या कुटुंबाची माहिती प्राप्त करत शहनिशा केली. ७ मे रोजी बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइन व बालगृह यांच्या माध्यमातून चाइल्ड लाइनमधील पुरुषोत्तम कांबळे, बालगृहातील आदेश राठोड, पोलिस कर्मचारी अंकुश कुरवडे यांच्यासोबत बालकास स्वजिल्ह्यात पाठविण्यात आले.