अत्यल्प पेन्शन, मोफत प्रवासही नाही
By Admin | Updated: January 3, 2016 02:46 IST2016-01-03T02:46:57+5:302016-01-03T02:46:57+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात अल्प वेतनावर अहोरात्र आपले आयुष्य घालविणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना चहा-पाण्याच्या खर्चाइतकीही पेन्शन मिळत नाही.

अत्यल्प पेन्शन, मोफत प्रवासही नाही
राज्य परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची व्यथा
तळेगाव (श्या.पंत) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात अल्प वेतनावर अहोरात्र आपले आयुष्य घालविणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना चहा-पाण्याच्या खर्चाइतकीही पेन्शन मिळत नाही. शिवाय त्यांना वृद्धापकाळात बसने विनामूल्य प्रवास करण्याची मुभाही दिली जात नाही. यामुळे निवृत्त कर्मचारी हतबल झाले आहेत. वृद्धापकाळात तरी शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी निवृत्त वाहतूक नियंत्रक विनायक तभाने यांनी केली आहे.
राज्य परिवहन महामंडळामध्ये ३५ ते ४० वर्षे वाहक-चालक पदावर दिवस-रात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार ५८ वर्षे पूर्ण होताच निवृत्ती दिली जाते. संपूर्ण सेवाकाळात अत्यल्प वेतनावर हे कर्मचारी कार्यरत असतात. निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शनही अत्यल्प असून त्या रकमेतून औषधोपचार, दैनंदिन खर्चही भागत नाही. अशावेळी नातलगाच्या भेटीला वा देवदर्शनाला एसटी बसने प्रवास करण्यासाठीही या कर्मचाऱ्यांकडे पैसा राहत नाही. शासनाच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना मरेपर्यंत सोई-सुविधा दिल्या जातात; पण परिवहनच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाही.
एसटीचा कर्मचारी दिवाळी, दसरा, लग्न, मुत्यू वा अन्य कोणत्याही दिवशी कुटुंबात राहू शकत नाही. केवळ सेवा तत्त्वावर एसटी आपले घर व प्रवासी नातलग समजून वयाचे ५८ वर्षे हिवाळा, पावसाळा, उन्हाळ्यात एसटीतच धावत असतात. त्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर परिवहन महामंडळही वाऱ्यावर सोडत असल्याचा प्रत्यय येत आहे. या प्रकारामुळे परिवहनच्या निवृत्त कमचाऱ्यांचे हाल होत असल्याचे दिसते. राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांना किमान जगण्यापूरते निवृत्तीवेतन देणे गरजेचे आहे. शिवाय निवृत्तीनंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विनायक तभाने यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.(वार्ताहर)