दारूविक्रेत्या कुटुंबाचा महिला पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला
By Admin | Updated: May 17, 2017 00:31 IST2017-05-17T00:31:19+5:302017-05-17T00:31:19+5:30
दारू पकडण्यास गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर दारूविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाने हल्ला केला.

दारूविक्रेत्या कुटुंबाचा महिला पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला
इतवारा भागातील घटना : महिला, मुलगा ताब्यात, पती फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दारू पकडण्यास गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर दारूविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाने हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री इतवारा परिसरात घडली. दारूविक्रेत्या कुटुंबातील सदस्यांनी सदर महिला पोलीस अधिकाऱ्याला शिविगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
गावठी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून शहर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके यांनी पथकासह इतवारा परिसर गाठला. त्यांनी चेतना पाला हिच्या घराची झडती घेतली असता गावठी दारूने भरलेली कॅन व ग्लास दिसून आला. यावेळी दारूविक्रेत्या चेतना पाला, तिचा पती संजय तसेच मुलगा व मुलीने कारवाई करण्यास आलेल्या पोलिसांशी वाद घालत पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके यांच्यावर हल्ला चढवित मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. आरोपींनी त्यांचे कपडे फाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी रामटेके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतना पाला, तिच्या पतीसह मुलगा व मुलीवर भादंविच्या कलम ३९४, ३५३, ३३२, ३४, ६५ (ई.) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले.
पाला दाम्पत्यावर चंद्रपुरातही गुन्हे
इतवारा भागातील चेतना पाला व तिचे कुटुंबिय दारूविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरूद्ध दारूविक्रीबाबत वर्धेसह चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ४० गुन्हे दाखल आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर पाला कुटुंबाने गावठी दारू विक्रीचा ठोक व्यवसाय सुरू केला. पोलिसांवरच हल्ले होत असल्याने वचक नसल्याची शहरात चर्चा आहे.