कारंजा येथे सुशिक्षित बेरोजगारांना लाखोेंचा गंडा; टोळी सक्रिय
By Admin | Updated: October 14, 2016 02:44 IST2016-10-14T02:44:46+5:302016-10-14T02:44:46+5:30
तळेगाव येथील एका शिक्षकासह त्याच्या भावाने नोकरीचे आमिष देत कारंजा येथील युवकाला गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

कारंजा येथे सुशिक्षित बेरोजगारांना लाखोेंचा गंडा; टोळी सक्रिय
आष्टी (शहीद) : तळेगाव येथील एका शिक्षकासह त्याच्या भावाने नोकरीचे आमिष देत कारंजा येथील युवकाला गंडा घातल्याचे उघड झाले आहे. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर सुशिक्षित बेरोजगार पैसे परत मागण्यासाठी समोर आले आहे. या प्रकरणात पैसे देण्यास होणार दिल्याने अद्याप पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली नाही. यामुळे परिसरात सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे देत लुबाडणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
उच्च शिक्षितांना बनावट माहिती देत नोकरीचे आमिष देणारी टोळी गत वर्षभरापासून तालुक्यात सक्रिय झाली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरूणांकडून पैसे उकळण्याचे काम येथे सर्रास सुरू आहे. यामध्ये काही शिक्षण विभागातील कर्मचारी असल्याची चर्चा जोरात आहे. कार्पोरेशन बँक, खाजगी महाविद्यालयातील माहितीचे बुकलेट आणून सुशिक्षित तरुणांना दाखविण्याचे काम या टोळीकडून सुरू आहे.
कारंजा (घा.) तालुक्यामधील एका तरुणाकडून कार्पोरेशन बँकेत नोकरी देण्याच्या नावाखाली दीड लाख रुपये उकळण्यात आले. आता नोकरी लागली नाही म्हणून या तरुणाने तळेगाव येथील फसविणाऱ्या दलालास पैसे परत मागितले असता त्या दलालाने आपल्या भावाकडे पैसे असल्याचे सांगितले. त्याचा भाऊ एका नामांकित विद्यालयात शिक्षक आहे.
तिघांकडून घेतले साडेचार लाख
आर्वी येथील तीन तरुणांकडून तळेगावच्या या दलालाने प्रत्यकी दीड लाख याप्रमाणे साडेचार लाख रुपये घेतले आहे. नोकरी लागली नसल्याने त्यांनी पैसे परत मागायला तगादा लावला आहे. मात्र कोणीही पोलिसात तक्रार दिली नाही. या टोळीमधील भामट्यांनी निव्वळ आर्थिक लुट चालविली आहे. त्यांना पोलीस खाक्या दाखविल्याशिवाय पैसे परत मिळणे कठीण झाले आहे. अशाचप्रकारे गत अनेक दिवसांपासून नोकरीच्या नावाखाली ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना लुबाडणूक करणारी टोळी विविध फंडे देवून वावरत असल्याने त्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)