लाखो लिटर पाणी व्यर्थ
By Admin | Updated: February 21, 2017 01:13 IST2017-02-21T01:13:10+5:302017-02-21T01:13:10+5:30
उन्हाळ्याची चाहुल लागली असून उन्ह तापू लागले आहे. फेबु्रवारी महिन्यातच पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे.

लाखो लिटर पाणी व्यर्थ
सदोष व्हॉल्व्हचा परिणाम : बाजार समितीच्या आवारात साचला तलाव
वर्धा : उन्हाळ्याची चाहुल लागली असून उन्ह तापू लागले आहे. फेबु्रवारी महिन्यातच पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे. यामुळे उन्हाळ्यातील टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे; पण ही बाब प्रशासनालाच सांगावी लागत असल्याचे चित्र आहे. सदोष व्हॉल्व्हमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. हा प्रकार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडत असून पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
वर्धा शहराला धाम नदीवरून पाणी पुरवठा होतो. शहर अधिक अकरा गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत तर शहरातील काही भागाला नगर परिषदेमार्फत पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही यंत्रणांच्या पाणी पुरवठा योजनेमधील कामे सदोष असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पालिकेची शहरातील अनेक ठिकाणची पाईपलाईन वारंवार फुटते. परिणामी, पाण्याचा अपव्यय होतो. जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनच्या लिकेजचे प्रकारही वारंवार घडतात. गत काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचा व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला आहे. या ‘एअर व्हॉल्व्ह’मध्ये वारंवार बिघाड येत असल्याने लाखो लिटर पाणी दररोज वाहून जात आहे. या परिसरातील व्हॉल्व्हला सुरक्षिततेकरिता कुठलीही यंत्रणा नसल्याने त्या भागातील टार्गट मुले व नागरिक या व्हॉल्व्हची नासधूस करतात. पाणी भरण्यासह आंघोळ करणे, कपडे धुण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे तेथील उपस्थितांकडून सांगण्यात आले. नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
साचलेले पाणी, चिखलामुळे घाणीचे साम्राज्य
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिंतीच्या आत असलेल्या या व्हॉल्व्हमध्ये वारंवार बिघाड येत असल्याने लाखो लिटर पाणी वाहून जाते. हे पाणी बाजार समितीच्या आवारामध्ये साचत असल्याने त्या भागाला तलावाचेच स्वरूप आले आहे. सतत पाणी साचत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वराहांचा मुक्तसंचार दिसून येतो. पाण्यामुळे गवत, झुडपे वाढली असून दुर्गंधी पसरली आहे. सतत पाणी साचत असल्याने संपूर्ण परिसर जलमय झाल्याचे दिसते. बाजार समिती प्रशासनही याकडे लक्ष देत नसल्याचेच दिसते.