मिलिंद भेंडेचे सभापतिपद धोक्यात
By Admin | Updated: March 4, 2016 02:04 IST2016-03-04T02:04:42+5:302016-03-04T02:04:42+5:30
जिल्हा परिषद पदाधिकारी कोणतीही अर्जित रजा न घेता सतत महिनाभर गैरहजर असल्यास त्याचे पद धोक्यात येते, असा नियम आहे.

मिलिंद भेंडेचे सभापतिपद धोक्यात
जिल्हा परिषदेची सभा रद्द : राजीनामा मागणीचे सर्व प्रस्ताव धुडकावले
वर्धा : जिल्हा परिषद पदाधिकारी कोणतीही अर्जित रजा न घेता सतत महिनाभर गैरहजर असल्यास त्याचे पद धोक्यात येते, असा नियम आहे. शिक्षण व आरोग्य समिती सभापती मिलिंद भेंडे महिनाभरापासून जिल्हा परिषदेच्या लेखी गैरहजर असल्यामुळे त्यांचेही पद धोक्यात असल्याची चर्चा जि.प. वर्तुळात सुरू आहे.
लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मिलिंद भेंडे ५ फेब्रुवारीपासून अटकेत आहे. येत्या ५ तारखेला या कारवाईला महिना पूर्ण होत आहे. अशातच शुक्रवारी (दि.४) जिल्हा परिषदेच्या सभापती व विभाग प्रमुखांची सभा बोलाविली होती. या सभेला हजर राहण्यासाठी भेंडेनी न्यायालयातून परवानगीही मिळविली होती; मात्र ती सभाच ऐनवेळी रद्द झाल्यामुळे सभापतिपद वाचविण्याचे भेंडे यांचे प्रयत्न निष्फळ ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
आगामी काळात जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या पंचावार्षिक निवडणुका आहे. मिलिंद भेंडेचे प्रकरण म्हणजे, विरोधकांच्या हाती आयते कोलीत. प्रकरण उघडकीस आल्यापासून भाजपश्रेष्ठी चूप्पी साधून आहे, असा संदेश जनतेमध्ये जात आहे. यामुळे निवडणुकांना सामोरे जाणे पक्षासाठी अवघड होईल, ही गंभीर बाब लक्षात येताच भाजपश्रेष्ठींकडून हालचालींना वेग आला. यापूर्वी भाजपप्रणित तळेगाव(टा.) ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरण उचलून धरल्यामुळे तत्कालिन जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी एकाएकी प्रशांत वंजारी या भाजप कार्यकर्त्याला पक्षातून निलंबित केले; मात्र आता भेंडेबाबत विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश बकाने हे कोणतीही जाहीर भूमिका घेताना दिसले नाही. याचा अर्थ अशा प्रकरणाला भाजपश्रेष्ठींचे समर्थन समजावे काय, असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते आपसात विचारत आहे. भाजपचे विदर्भ संघटक उपेंद्र कोठेकर यांनी राजीनामा देण्यासाठी भेंडेकडे निरोप पाठविला होता. इतकेच नव्हे, तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भेंडेला राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. भेंडेच्या नकारामुळे भाजपश्रेष्ठींची चांगलीच कोंडी झाली आहे. अशातच जिल्हा परिषदेला सतत महिनाभर गैरहजर राहिल्यामुळे भेंडेचे सभापतिपद धोक्यात असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
पक्षश्रेष्ठींकडून हालचालींचा संशय?
येत्या १८ तारखेला सादर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत शुक्रवारी (दि.४) अर्थ व नियोजन समिती या नात्याने उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी विषय समित्यांचे प्रमुख आणि सभापतींची सभा बोलाविली होती. काही अपरिहार्य कारणामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी मिलिंद भेंडे यांनी न्यायालयाची परवानगी देखील मिळविलेली होती. सभाच रद्द झाल्याने भेंडेला मोठा हादरा बसला आहे. ही सभा भेंडे यांचे सभापतिपद वाचविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती, असे जाणकार सांगतात. भाजपश्रेष्ठींच्या हालचालीमुळे ही सभा रद्द झाल्याची आतील गोटातील माहिती आहे.