मनरेगा मजुरांचे वेतन रखडले
By Admin | Updated: August 1, 2014 00:24 IST2014-08-01T00:24:41+5:302014-08-01T00:24:41+5:30
देवळी तालुक्यातील बाभुळगाव (खोसे) येथील मनरेगा मजूरांचे वेतन सात महिन्यांपासून रखडले आहे. वेतनापासून वंचित मजूरांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून याची दखल घेत तातडीने

मनरेगा मजुरांचे वेतन रखडले
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन : वेतन देण्यास ग्रा.पं.ची टाळाटाळ
वर्धा : देवळी तालुक्यातील बाभुळगाव (खोसे) येथील मनरेगा मजूरांचे वेतन सात महिन्यांपासून रखडले आहे. वेतनापासून वंचित मजूरांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून याची दखल घेत तातडीने आर्यवाही करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मजूरांना ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यावर योग्य माहिती मिळत नाही. म्हणून येथील रोहयो मजूर त्रस्त आहे. वेतनाअभावी या मजूरांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. याची दखल घेवून त्वरीत रखडलेले वेतन देण्याची विनंती केली आहे.
बाभुळगाव (खोसे) येथील रोजगार हमी योजनेत कार्यरत मजुरांनी ग्रामपंचायतचे वृक्षारोपणाचे काम केले. गत सात ते आठ महिन्यांपासून हे मजूर काम करतात. वृक्षसंवर्धनाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने हे काम योजनेअंतर्गत सुरू आहे. मात्र या मजूरांना वेतन मिळाले नाही.
ग्रामीण भागातील नागरिकांना शेती व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या रोजगारावर विसंबून रहावे लागते. याला पर्याय म्हणून शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली. मात्र या योजनेत कार्यरत मजूरांना अनियमित वेतनाप्रमाणेच अन्य समस्यांना तोंड दयावे लागते. या मजूरांना रखडलेले वेतन देण्याचे निर्देश ग्रामपंचायत प्रशासनाला दयावे, अशी मागणी निवेदन देताना मजूरांनी केली. या मागणीचे निवेदन देताना पुंडलिक डाहाटे, शंकर नांदणे, भिमराव धुर्वे आदी मजूर उपस्थित होते. गटविकास अधिकारी निवेदनानंतर काय कार्यवाही करतात याकडे मजूरांचे लक्ष लागले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)