कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पुरुष माघारले
By Admin | Updated: June 15, 2015 02:11 IST2015-06-15T02:11:29+5:302015-06-15T02:11:29+5:30
कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट जिल्ह्यात बरेच साध्य झाल्याचे आरोग्य विभागातील नोंदीवरून दिसते.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पुरुष माघारले
गौरव देशमुख वर्धा
कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट जिल्ह्यात बरेच साध्य झाल्याचे आरोग्य विभागातील नोंदीवरून दिसते. या शस्त्रक्रियेत मात्र पुरूष माघार घेत असल्याचे उघड होत आहे. जिल्ह्यात महिलांवरच या शस्त्रक्रिया झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे या शस्त्रक्रियेत पुरूषांत अद्यपाही जागरूकता नसल्याचे दिसत आहे.
पुरूष प्रधान संस्कृती असलेल्या समाजात या शस्त्रक्रियेत मात्र महिलांनी आघाडी घेतली आहे. जिल्ह्याने कुटुंब नियोजनाचे उदिष्ट गाठले खरे परंतु पुरूषाचे प्रमाण यात अत्यल्प असल्याने जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला पुरूष शस्त्रक्रिया करण्यासाठी ग्रामीण भागात जावून जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आरोग्य विभागात झालेल्या नोंदीनुसार २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात २४६ पुरूषांनी तर ५ हजार ३६९ स्त्रियांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली आहे. पुरूष आणि स्त्रियांनी केलेल्या शस्त्रक्रियेच्या प्रमाणाची तुलना केल्यास पुरूष शस्त्रक्रियेचे प्रमाण नगण्य आहे. २०१४-१५ या वर्षात मार्च महिन्यापर्यंत १६४ पुरूष आणि ६ हजार ८५८ स्त्रियांवर ही शस्त्रक्रिया झाली आहे.
पुरूष कमावते असल्याने शस्त्रक्रियेमुळे अशक्तपणा यईल अशी भावना पुरूषात असल्याचे या संख्येवरून दिसत आहे. यामुळे जिल्ह्यात या शसत्रक्रियेकरिता महिलांनाच पुढे करण्यात येत असल्याची चर्चा आहे.