सदस्य, ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या रथाची दोन चाकेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:01 IST2018-12-31T21:01:07+5:302018-12-31T21:01:23+5:30
आपल्या गावातील ग्रामपंचायत म्हणजे विकासात्मक तसेच प्रशासनिक कामकाजाकरिता सामान्य जनतेचा आधार आहे. सदस्य व ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीच्या रथाची दोन चाके आहेत. सरपंच त्या रथाचा सारथी आहे.

सदस्य, ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या रथाची दोन चाकेच
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आपल्या गावातील ग्रामपंचायत म्हणजे विकासात्मक तसेच प्रशासनिक कामकाजाकरिता सामान्य जनतेचा आधार आहे. सदस्य व ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीच्या रथाची दोन चाके आहेत. सरपंच त्या रथाचा सारथी आहे. गावाचा विकास करावयाचा असेल तर ग्रामपंचायतरूपी रथ योग्य रीतीने चालणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत उभी झालेली असून लोकार्पण होत आहे, ही अभिमानास्पद बाब असून सर्व जनतेनी ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी खासदार रामदास तडस यांनी नेरी पुनर्वसन (सालोड) येथे ग्रामपंचायतीच्या लोकार्पणप्रसंगी व्यक्त केले. नेरी पुनर्वसन येथे जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेरी पुनर्वसनचे सरपंच धनराज टुले, शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, लोकलेखा समितीचे सदस्य जयंत कावळे, सावंगीचे ठाणेदार दत्तात्रय गुरव, पंचायत समिती सदस्य साविता मुते, सालोडचे सरपंच नानाजी देशमुख, रामकृष्ण मिरगे, गिरीश कांबळे, उपसरपंच सविता कस्तुरे, सचिव बी. डी. कांबळे उपस्थित होते.
खासदार तडस म्हणाले, केंद्र व राज्य सरकार विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करीत आहे. समग्र ग्रामीण विकास हा ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच ग्रामीण भागात सुविधा राबवून ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात विकास केला गेला पाहिजे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना आहेत. त्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी शिवनेरी स्पोर्टिंग क्लबद्वारा आयोजित ५८ किलो वजनगटातील कबड्डी सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, सावंगीचे ठाणेदार दत्तात्रय गुरव, रामकृष्ण मिरगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच धनराज टुले तर संचालन चंद्रशेखर चाफले यांनी. उपस्थितांचे आभार स्वप्नील कठाणे यांनी मानले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य धीरज भगत, सदस्य देवराव क्षीरसागर, सदस्या, ममता मिरगे, सदस्य मंदा चाफले, सदस्य शांता क्षीरसागर, हरीश तडस यांच्यासह इतर सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.